ताज्या घडामोडीपिंपरी
प्रभाग क्रमांक १४मधील सोपानराव विष्णू काळभोर माध्यमिक विद्यालयामध्ये सेमी इंग्लिश अभ्यासक्रम सुरु करा -शादाब खान

काळभोरनगरमध्ये सेमी इंग्लिश शिक्षणाची मागणी – विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शादाब खान यांचे उपमुख्यमंत्र्यांकडे निवेदन”
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – प्रभाग क्रमांक १४ मधील सोपानराव विष्णू काळभोर माध्यमिक विद्यालयामध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत सेमी इंग्लिश अभ्यासक्रम सुरू करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते शादाब आलाभाई खान यांनी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री तसेच पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. अजित पवार यांच्याकडे केली आहे.
या निवेदनामध्ये त्यांनी प्रभागातील सोपानराव विष्णू काळभोर माध्यमिक विद्यालयामध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत सेमी इंग्लिश अभ्यासक्रम सुरू करण्याची मागणी केली आहे. यासोबतच, इयत्ता अकरावी व बारावीचे देखील सेमी इंग्लिश वर्ग सुरू करण्यात यावेत, अशीही विनंती करण्यात आली आहे.
खान यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, आजच्या स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावर टिकून राहण्यासाठी इंग्रजी भाषेचे ज्ञान अत्यंत गरजेचे आहे. इंग्रजी शिक्षण हे भविष्यातील करिअर व संधींना चालना देणारे साधन असल्यामुळे, गरीब व श्रमिक वर्गातील विद्यार्थ्यांनाही दर्जेदार इंग्रजी शिक्षण सहजपणे उपलब्ध व्हावे, हा या मागणीमागचा मुख्य हेतू आहे.
ते पुढे म्हणाले की, जसे दळवी नगर येथील महात्मा फुले विद्यालयात सेमी इंग्लिश वर्ग यशस्वीपणे चालवले जात आहेत, त्याच धर्तीवर काळभोरनगरमधील विद्यालयातही हे वर्ग सुरु व्हावेत. विशेषतः अशा शाळांमध्ये शिकणाऱ्या मुलांचे पालक हे आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मोफत मिळावे, ही काळाची गरज आहे.
शादाब खान यांनी यावेळी संविधान निर्माता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचारही उद्धृत करत शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. “शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, जे कोणी प्याल त्याने गुरगुरले पाहिजे” या बाबासाहेबांच्या विचारांवर आधारित समाजातील सर्व थरातील मुलांना समान संधी मिळावी, यासाठी त्यांनी ही मागणी केली.
या निवेदनामुळे काळभोरनगरमधील नागरिकांमध्ये आशेचा किरण निर्माण झाला आहे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सकारात्मक प्रतिसादाची सर्वजण उत्सुकतेने वाट पाहत आहेत.













