ताज्या घडामोडीपिंपरीमावळ

यशोदा महादेव काकडे अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘दीक्षारंभ २०२५’ सोहळा उत्साहात संपन्न

प्रथम वर्ष प्रवेशित विद्यार्थ्यांचे दिमाखात स्वागत

Spread the love

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – तळेगाव दाभाडे येथील यशोदा महादेव काकडे अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रथम वर्षाला प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा ‘दीक्षारंभ २०२५’ या स्वागत समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी कला जनसेट’चे सर्वेसर्वा व प्रसिद्ध उद्योजक मनोजकुमार फुटाणे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे होते. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष दीपक शाह, कार्यवाह चंद्रकांत शेटे, खजिनदार शैलेश शाह, सदस्य संजय साने, गणेश खांडगे, विलास काळोखे, निरुपा कानिटकर, बाळासाहेब काकडे, रणजित काकडे, युवराज काकडे, नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे सहसचिव नंदकुमार शेलार, प्राचार्य डॉ. एस. एन. पाटील, उपप्राचार्य डॉ. अमृता सुराणा, इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे आदी मान्यवर उपस्थित होते.

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मनोजकुमार फुटाणे म्हणाले, अभियांत्रिकीचा विचार करताना केवळ तांत्रिक बाबी विचारात न घेता सर्जनशीलतेने आपल्या कामातून आपण व्यक्त झाले पाहिजे. तांत्रिक ज्ञान महत्त्वाचे आहेच; परंतु अभियांत्रिकी पदवी घेतलेला विद्यार्थी हा अधिक इनोव्हेटिव्ह असेल, तर निश्चित यशाला गवसणी घालणे शक्य होते. पदवी सोबतच प्रत्यक्ष कामातील अनुभव हा अधिक काही शिकविणारा असतो. त्यामुळे कामात कौशल्याचा अधिक वापर आपल्याला अधिक यशस्वी बनवतो, असा कानमंत्रही त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.

कार्यवाह चंद्रकांत शेटे यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत संस्थेच्या विकासाचा आढावा घेतला. ते म्हणाले, इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेला भक्कम आणि वैभवशाली शैक्षणिक परंपरा आहे. काही अडचणींमधून पुढे येत आज अभियांत्रिकी महाविद्यालयाचे स्वप्न साकार होत आहे. विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाचे नाव उज्ज्वल करून दर्जायुक्त व गुणवत्तापूर्ण शिक्षण पद्धतीचा पायंडा पाडावा, असे आवाहन केले.

अध्यक्षीय भाषणात रामदास काकडे यांनी अभियांत्रिकी कॉलेजमध्ये शंभर टक्के प्लेसमेंटची हमी देत विद्यार्थ्यांचे पालकत्व घेऊन विद्यार्थी घडवण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले. ते म्हणाले की, विद्यार्थ्यांनी समाज आणि राष्ट्राचा विकास डोळ्यासमोर ठेवून आपली शैक्षणिक वाटचाल करायची आहे. चाकण ते हिंजवडी या विस्तारलेल्या औद्योगिक आणि आयटी हब पट्ट्याच्या केंद्रस्थानी तळेगाव दाभाडे असून, विद्यार्थ्यांना करिअरमध्ये प्रचंड संधी आहेत. शिक्षकांनी काळाच्या पुढे जाऊन विचार केला पाहिजे व त्या पद्धतीने विचारांची पेरणी विद्यार्थ्यांमध्ये करावी, असे आवाहन केले.
दरम्यान, अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या उभारणीतील योगदानाबद्दल संस्थेचे कार्यवाह चंद्रकांत शेटे व इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे यांचा विशेष सन्मान करण्यात आला. तसेच मनोजकुमार फुटाणे यांना इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेच्या सल्लागारपदी नियुक्ती केल्याचे पत्रही देण्यात आले.
सूत्रसंचालन प्रा. प्रियंका रोकडे व प्रा. दीप्ती कान्हेरीकर यांनी, तर आभार निरूपा कानिटकर यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button