रिंग रोडच्या भूसंपादन प्रक्रियेचा महानगर आयुक्तांनी घेतला आढावा

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – प्रस्तावित रिंग रोडच्या भूसंपादन प्रक्रियेसंबंधी सुरू असलेल्या कार्यवाहीचा पीएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी प्रशासकीय यंत्रणांकडून आढावा घेतला. टप्पा एक, दोन, तीन आणि चारसंदर्भात सुरू असलेल्या कार्यवाहीबाबत आढावा घेऊन तातडीने भूसंपादन प्रक्रिया आणि मोजणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रस्ताव पाठवण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.
पुणे शहर आणि परिसरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणांमार्फत विविध उपाययोजना करण्यात येत आहे. यात प्रामुख्याने प्रस्तावित रिंग रोडसह इतर महत्त्वाचे काही रस्ते रुंदीकरणाच्या अनुषंगाने कार्यवाही सुरू आहे. रिंग रोड टप्पा एक, दोन, तीन आणि चार असे असून सद्यस्थितीत टप्पा क्रमांक एक सोलू ते निरगुडीमधील ३ गावांची भूसंपादन प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. संबंधित शेतकऱ्यांना एफएसआय / टीडीआर देण्याच्या अनुषंगाने तातडीने संबंधित शेतकऱ्यांसोबत बैठका आयोजित करण्याचे निर्देश महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी दिले.
हिंजवडी व चाकण भागातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी प्रस्तावित रस्त्याच्या भूसंपादन प्रक्रियेबाबत माहिती जाणून घेतली. नवले ब्रीज परिसरातील वाहतूक व्यवस्थापनासाठी भूसंपादन, जलवाहिनीचे स्थलांतर व सिग्नल यंत्रणा बसविण्याबाबतची सद्यस्थिती जाणून घेण्यात आली. संबंधित विभागांनी समन्वयातून ऑक्टोबरपर्यंत कामे पूर्ण करण्याचे निर्देश दिले.
या बैठकीला पीएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे, अतिरिक्त महानगर आयुक्त दीपक सिंगला, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, विकास परवानगी व नियोजन विभागाचे संचालक अविनाश पाटील, जमीन व मालमत्ता विभागाचे सह आयुक्त हिम्मत खराडे, भूमिअभिलेख विभागाच्या अधीक्षक आशा जाधव, अधीक्षक अभियंता शिवप्रसाद बागडी, भूसंपादन समन्वय अधिकारी, पुणे महानगरपालिका, एनएचएआय, सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग विभाग यांच्यासह इतर विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.













