महात्मा फुले महाविद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – रयत शिक्षण संस्थेचे महात्मा फुले महाविद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. हा कार्यक्रम प्राचार्य डॉ. पांडुरंग भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.
शारीरिक शिक्षण व क्रीडा विभागातर्फे आयोजित या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी योग प्रात्यक्षिके व सराव सादर केला. तसेच ‘फिट इंडिया मूव्हमेंट’ची शपथ डॉ. वैशाली खेडकर यांनी वाचन करून विद्यार्थ्यांकडून ग्रहण करून घेण्यात आली.
महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. (डॉ.) पांडुरंग भोसले यांनी आपल्या भाषणातून हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांचे क्रीडा क्षेत्रातील योगदान अधोरेखित केले. तसेच क्रीडाभावना व निरोगी जीवनशैलीचे महत्त्व विद्यार्थ्यांसमोर मांडले.
या उपक्रमाच्या प्रसंगी महाविद्यालयाचे वाणिज्य विभागाचे उप-प्राचार्य प्रा. (डॉ.) सुहास निंबाळकर, कला विभागाच्या उप-प्राचार्या प्रा. (डॉ.) कामायनी सुर्वे तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. संग्राम गोसावी यांनी केले, तर आभार प्रदर्शन वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. मारुती केकाणे यांनी केले.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शारीरिक शिक्षण समिती सदस्य, महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले. संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन व आयोजन महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक डॉ. पांडुरंग लोहोटे यांनी केले.















