रहाटणीतील पवना नदी काठावरील पूरपरिस्थितीचा माजी नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन यांच्याकडून आढावा
पूरपरिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी उपाययोजना करण्याच्या महापालिका प्रशासनाला सूचना

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड शहर परिसरात तसेच धरणाच्या पाणलोट क्षेत्रात संततधार पाऊस सुरू आहे. शहरातून वाहणाऱ्या नद्यांवरील धरणामधून करण्यात येणाऱ्या पाणी विसर्गामुळे नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन यांनी रहाटणी परिसरातील पवना नदी काठ परिसराची पाहणी करून महापालिका प्रशासन आणि नागरिकांना सूचना दिल्या.
त्रिभुवन यांनी पवना नदीच्या काठावर असलेल्या पवनानगर, गंगानगर, रहाटणी गावठाण आणि श्री शंकर मंदिर परिसरात मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्थापत्य विभागाचे उपअभियंता श्री. बोरसे, कनिष्ठ अभियंता अमित पवार आणि आरोग्य अधिकारी गणेश राजगे उपस्थित होते.
नदीकाठच्या परिसरात पाण्याची पातळी वाढल्याने नदीकाठच्या वस्त्यांमध्ये पाणी आले आहे. पूरपरिस्थितीमुळे रस्ते, घरं आणि सार्वजनिक ठिकाणी पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. यावेळी नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन यांनी स्थानिकांना पुरापासून सुरक्षित राहण्यासाठी महत्त्वपूर्ण सूचना केल्या. त्यांनी रहिवाशांना नदीकाठापासून सुरक्षित अंतर राखण्याचे, पाण्यातून प्रवास टाळण्याचे आणि आपत्कालीन परिस्थितीत प्रशासनाशी संपर्क साधण्याचे आवाहन केले.
उपअभियंता बोरसे आणि कनिष्ठ अभियंता अमित पवार यांनी पूरग्रस्त भागातील पाण्याचा निचरा आणि रस्त्यांची दुरुस्ती यासाठी तातडीच्या उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले. तसेच, आरोग्य अधिकारी गणेश राजगे यांनी पूरग्रस्त भागात स्वच्छता आणि आरोग्य सुविधा पुरवण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याचे सांगितले. पूरामुळे पाण्याच्या शुद्धतेवर परिणाम होऊ नये यासाठी विशेष खबरदारी घेतली जाईल, असे त्यांनी नमूद केले.
नगरसेवक त्रिभुवन यांनी प्रशासनाला पूरपरिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी तात्काळ उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. स्थानिक रहिवाशांनीही प्रशासनाच्या या प्रयत्नांना सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच ग क्षेत्रीय अधिकारी किशोर ननावरे यांच्याशी संपर्क साधून दोन सुरक्षारक्षकांची नेमणूक करण्यासंदर्भात व पुराचे पाणी वस्तीत शिरल्यास नागरिकांना रहाटणीतील महापालिकेच्या शाळा क्रमांक 55 मध्ये सुरक्षित स्थळी निवाऱ्याची व्यवस्था करण्याच्या सूचना त्रिभुवन यांनी यावेळी दिल्या.
या पाहणीमुळे स्थानिकांना दिलासा मिळाला असून, नागरिकांनी बाबासाहेब त्रिभुवन यांचे आभार मानले. तसेच प्रशासनाकडून तातडीने उपाययोजना केल्या जाण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.















