रहाटणीतील लाडक्या बहिणींकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ५५० राख्या आणि रक्षाबंधनाच्या शुभेच्छा
आमदार शंकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन यांच्या पुढाकारातून महिलांचा उपक्रम

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना रक्षाबंधनानिमित्त रहाटणी, पुणे येथील लाडक्या बहिणींनी ५५० राख्या पाठवून हृदयस्पर्शी शुभेच्छा दिल्या आहेत. “देवाभाऊ, तुम्ही चांगलं काम करत आहात; तुम्हाला दीर्घायुष्य लाभो!” अशा भावनिक संदेशासह या राख्या पाठवण्यात आल्या, ज्यामुळे फडणवीस यांच्यावरील प्रेम आणि विश्वास दिसून येतो.
रहाटणीतील महिलांनी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’च्या माध्यमातून मिळालेल्या आर्थिक सक्षमीकरणाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. या योजनेंतर्गत २१ ते ६५ वयोगटातील पात्र महिलांना दरमहा १५०० रुपये मिळतात, ज्यामुळे त्यांच्या जीवनमानात सुधारणा झाली आहे. रक्षाबंधनाच्या खास मुहूर्तावर, ९ ऑगस्ट २०२५ रोजी या योजनेचा १३ वा हप्ता महिलांच्या खात्यात जमा झाला, ज्यामुळे त्यांचा उत्साह द्विगुणित झाला.
यावेळी बोलताना महिलांनी सांगितले की, “देवाभाऊंनी आम्हाला आर्थिक स्वातंत्र्य दिले. त्यांच्यासाठी ही राखी आणि त्यांच्या दीर्घायुष्यासाठी दिलेल्या शुभेच्छा या आमच्या मनापासूनच्या भावना आहेत. पुढील काळातही देवेंद्र फडणवीस हेच कायमस्वरूपी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असावेत ही आमची सदिच्छा आहे.
या प्रसंगाने रहाटणीतील महिलांचा उत्साह आणि फडणवीस यांच्यावरील विश्वास पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.
दरम्यान, या उपक्रमासाठी माजी नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन यांनी पुढाकार घेतला. या उपक्रमांतर्गत रहाटणी प्रभागातून महिलांनी दिलेल्या ५५० राख्या आणि वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेल्या शुभेच्छा त्यांच्यापर्यंत पोहचविण्यात येतील, असेही त्रिभुवन यावेळी म्हणाले.













