महापालिका शाळांमधील पाच गुणवंत विद्यार्थ्यांना उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते लाखांचे बक्षीस

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळांमधील दहावीत ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण प्राप्त झालेल्या पाच गुणवंत विद्यार्थ्यांचा आज गौरव करण्यात आला. महापालिकेच्या वतीने या विद्यार्थ्यांना प्रत्येकी एक लाख रुपयांचा धनादेश उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते देण्यात आला. तसेच विद्यार्थ्यांना डीबीटीच्या साहित्याचे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी शिक्षण विभागाची सक्षम हस्तपुस्तिका, इंग्रजी हस्तपुस्तिका, डिजिटल लर्निंग बालवाडी दिनदर्शिका, प्राथमिक दिनदर्शिका, पालक दिनदर्शिकेचे उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी उपमुख्यमंत्री पवार यांचा विद्यार्थ्यांनी बनवलेल्या कला वस्तू देऊन सन्मान केला.
‘या’ विद्यार्थ्यांचा झाला सन्मान!
स्वप्नाली झिंजे – निगडी माध्यमिक शाळा (९६.००%), महतो धीरेंद्रकुमार गजेंद्र – खराळवाडी माध्यमिक शाळा (९०.८०%), गायत्री संतोष बीजमवर – काळभोर नगर माध्यमिक शाळा (९४.४०%), इशा शशिकांत पाटील – छत्रपती शाहू महाराज इंग्रजी माध्यम शाळा, कासारवाडी (९७.६०%), श्रावणी दीपक टोणगे – छत्रपती शाहू महाराज इंग्रजी माध्यम शाळा, कासारवाडी (९३.००%).














