हर्षवर्धन पाटील यांचा ‘नवभारत शिल्पकार’ पुरस्काराने गौरव
पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – शैक्षणिक क्षेत्रात पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचा (पीसीईटी) नावलौकिक जागतिक पातळीवर पोहचविण्यात पीसीईटीचे विश्वस्त व पीसीयूचे कुलपती हर्षवर्धन पाटील यांचे अमूल्य योगदान आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते नवभारत समुहाचे व्यवस्थापकीय संपादक निमिष महेश्वरी यांच्या उपस्थितीत पीसीयुचे कुलपती हर्षवर्धन पाटील यांना ‘नवभारत के शिल्पकार’ हा प्रतिष्ठेचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळी पीसीईटीचे कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, पीसीयुच्या प्रभारी कुलगुरू डॉ. मणीमाला पुरी आदी उपस्थित होते.
‘नवभारत के शिल्पकार’ हा पुरस्कार ज्या संस्थांनी आपल्या देशाच्या शैक्षणिक क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. प्रतिभेचे संगोपन करणे, आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध कार्यक्रमात सहभाग, संशोधनाला चालना देणे, नवोपक्रमाला चालना देणे, विकसित भारताच्या उभारणीसाठी दीर्घकालीन योजना आखणे आणि भविष्यातील आव्हानांसाठी विद्यार्थ्यांना तयार करणे यासाठी दिला जातो.
पीसीईटी शैक्षणिक समुहातील विविध संस्थांमधून के. टू पीएचडी आणि पीसीयु मध्ये आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शिक्षण दिले जाते. याबरोबरच प्राचार्य, प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचे कठोर परिश्रम. शिक्षणासाठी दिल्या जाणाऱ्या दर्जेदार सुविधा, तसेच पालकांनी दाखविलेला विश्वास यामुळेच पीसीईटीने शैक्षणिक कामगिरीवर जागतिक पातळीवर नावलौकिक मिळविला आहे. या पुरस्काराने अधिक जबाबदारी वाढली असून भविष्यातील कार्यासाठी प्रेरणा मिळाली आहे, अशी भावना हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केली.
या पुरस्काराने भविष्यात आणखी मोठ्या कामगिरीच्या दिशेने पाऊल टाकण्यासाठी बळ मिळाले आहे असे पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे यांनी सांगितले. हर्षवर्धन पाटील यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी अभिनंदन केले आहे.
————————————–