आणीबाणीतील लढवय्यांचा पिंपरी-चिंचवडमध्ये गौरव;भाजपा शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांच्या नेतृत्वात लोकशाहीच्या संरक्षणाचा संकल्प
”इंदिरा गांधींनी लोकशाहीचा खून केला!" – महेश कुलकर्णी

कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते, भाजपाचे प्रदेश सदस्य महेश कुलकर्णी यांनी आणीबाणीच्या काळावर अत्यंत कठोर शब्दांत भाष्य केले. “आणीबाणी म्हणजे इंदिरा गांधी यांनी लोकशाहीचा केलेला खून!” या शब्दांत त्यांनी तत्कालीन परिस्थितीवर घणाघाती टीका केली. कुलकर्णी यांनी आपल्या भाषणात आणीबाणीच्या काळातील अनेक हृदयद्रावक प्रसंगांचे सविस्तर वर्णन केले. तत्कालीन शासनाच्या दडपशाहीचे आणि नागरिकांनी भोगलेल्या यातनांचे विदारक चित्र त्यांनी मांडले. लोकशाही स्वातंत्र्यावर गदा आणणाऱ्या त्या कटू आठवणींना उजाळा देताना, वारंवार राज्यघटनेत बदल करण्याचे पाप इंदिरा गांधी यांच्या सहका-यांनी केल्याचे सांगत इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारने ६० ते ७० वर्षांच्या काळात जनतेचे मूलभूत हक्क कसे हिरावून घेतले, यावर तीव्र शब्दांत टीका केली. कुलकर्णी यांनी लोकशाही मूल्यांसाठी संघर्ष करणाऱ्या आणि तुरुंगवास भोगलेल्या लढवय्यांच्या त्यागाचे स्मरण केले. तसेच, लोकशाहीच्या रक्षणासाठी सदैव कटिबद्ध राहण्याची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
या प्रसंगी, आणीबाणीच्या काळात लोकशाहीसाठी संघर्ष केलेल्या अनेक मीसाबंदी व त्यांच्या कुटुंबियांचा सन्मान करण्यात आला. सन्मानित करण्यात आलेल्या लढवय्यांमध्ये दादा ढवाण, माजी नगरसेवक प्रल्हाद जाधव, भरत देशपांडे, मधुसूदन जाधव, जयंत वैद्य, भालचंद्र देशपांडे, सतीश बोरकर, शरद खांबे, प्रकाश डांगे, महादेव वाठारकर, शंकर किल्लेदार, भास्कर भदाणे, धोंडीराज ओक, अशोक काची, प्रशांत हरहरे, गोविंद जेस्ते, श्रीकृष्ण काणे, रघुनाथ कुंभार, सुभाष बोधे, अविनाश खेडकर, पांडुरंग भांडेकर, दीपक दिवेकर, आणि विजयसिंह रजपूत यांचा समावेश होता.
भाजपा शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे यांनी, या सर्व मीसाबंदी आणि लोकशाहीच्या रक्षक लढवय्यांच्या शौर्याला आणि त्यागाला शतशः प्रणाम केला. लोकशाहीच्या रक्षणासाठी भारतीय जनता पार्टी सदैव कटिबद्ध असल्याचे यावेळी स्पष्ट केले. हा सोहळा केवळ सन्मानाचा नव्हता, तर लोकशाही मूल्यांचे जतन करण्यासाठी आणि भविष्यात अशा हुकूमशाही प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी दृढ संकल्प करण्याचा एक प्रेरणादायी क्षण ठरल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बिभीषण चौधरी यांनी केले. सुत्रसंचालन मोरेश्वर शेडगे तर आभार अजित कुलथे यांनी मांडले.













