चिंचवडताज्या घडामोडीपिंपरी
केशवनगर येथील मोरया क्रीडांगण परिसरात सार्वजनिक सुलभ शौचालयाची दयनीय अवस्था; नागरिकांच्या तक्रारीनंतर प्रशासनाकडून आश्वासन

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – केशवनगर, चिंचवड येथील मोरया गोसावी क्रीडांगण परिसरात नागरिक व खेळाडूंसाठी उभारण्यात आलेल्या सुलभ शौचालयांची अवस्था सध्या अत्यंत दयनीय झाली आहे. व्यायामासाठी तसेच सकाळ-संध्याकाळी फिरण्यासाठी येणाऱ्या महिलांना आणि नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.
सदर शौचालयांचे काही महिन्यांपूर्वीच नूतनीकरण झाले असले तरी सध्या तेथील कमोड खराब, बॉक्स तुटलेले, वापरण्यात येणाऱ्या बादल्या जर्जर स्थितीत असल्याचे निदर्शनास आले आहे. या गंभीर गैरसोयीबाबत नागरिकांनी महावितरण समिती सदस्य मधुकर बच्चे यांच्याकडे तक्रार केली होती.
या तक्रारीनंतर मधुकर बच्चे यांनी स्वतः जाऊन पाहणी केली असता अनेक त्रुटी उघड झाल्या. वापरण्यात आलेले साहित्य दर्जाहीन असल्याचे स्पष्टपणे दिसून आले असून, संबंधित अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळेच ही अवस्था निर्माण झाल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
या बाबत मधुकर बच्चे यांनी ‘ब’ क्षेत्रीय अधिकारी किरण कुमार मोरे यांच्याशी चर्चा करून लेखी निवेदन दिले. त्यांनी सविस्तर माहिती देत सदर शौचालयांमध्ये वापरण्यात आलेल्या साहित्याची चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी केली आहे.
या प्रकरणी किरण कुमार मोरे यांनी त्वरित कार्यवाही करणार असून, पुढे याप्रकारे दुर्लक्ष होणार नाही याची हमी दिली आहे.












