रुग्णालयातील नवजात अर्भक अपहरण रोखण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करावे – डॉ. नीलम गोऱ्हे
महिलांच्या आरोग्य, सुरक्षितता आणि सक्षमीकरणासाठी निर्णायक पावले; उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष आढावा बैठक

मुंबई,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली आज महत्त्वपूर्ण विषयांवर आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले. महिलांच्या आरोग्य, सुरक्षितता आणि अधिकारांसंदर्भातील प्रश्नांवर सखोल चर्चा करण्यात आली. विविध स्तरांवरील अधिकाऱ्यांनी या बैठकीस उपस्थित राहून आपल्या सूचना आणि अनुभव मांडले.
नवजात अर्भक चोरी आणि मातेच्या मृत्यूप्रकरणी गंभीर चिंता
उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन रुग्णालयांमध्ये होत नसल्याबाबत चिंता व्यक्त केली. शासकीय व खासगी रुग्णालयांतील बेफिकीरपणामुळे प्रसूतीनंतर मातेच्या मृत्यूच्या वाढत्या घटनांकडेही त्यांनी लक्ष वेधले. रुग्णालयांमध्ये नवजात अर्भकांचे अपहरण रोखण्यासाठी व नवजात अर्भकांच्या सुरक्षेसाठी सर्वोच्च न्यायालयाने तयार केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करण्यात यावे, जेणेकरून नवजात अर्भक अपहरण व पळवून नेण्याच्या घटनांना आळा बसेल, असे प्रतिपादन डॉ.नीलम गोऱ्हे यांनी केले.
ऊसतोड कामगार महिलांसाठी सॅनिटरी नॅपकिन्स वाटप — गरज आणि जबाबदारी
ऊसतोड कामगार महिलांना सॅनिटरी नॅपकिन्सची आवश्यकता आणि त्याचे पर्यावरणपूरक पर्याय शोधण्यावर भर देत त्यांनी सांगितले की, डिस्पोजल व्यवस्थेचा विचार करणे तितकाच महत्त्वाचा आहे. या प्रश्नासाठी महिला अधिकाऱ्यांची स्वतंत्र समिती स्थापण्याची सूचना त्यांनी केली.
त्याचबरोबर, १६ ते १९ वयोगटातील मुलींमध्ये गर्भाशयाच्या कॅन्सरविरोधात प्रतिबंधात्मक इंजेक्शन देण्याचा निर्णय महत्त्वपूर्ण असून, यासंदर्भात जनजागृती वाढवण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली.
महिलांच्या आरोग्यविषयक योजनांचा अंमलबजावणी अधिक प्रभावी होण्यासाठी आरोग्य व महिला बालकल्याण विभागांमध्ये समन्वय, तसेच तीन टक्के निधीचा समर्पक वापर होणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी बैठकीला छत्रपती संभाजीनगर, हिंगोली, धाराशिव, नांदेड, बीड, परभणी, वाशिम, लातूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हाधिकारी व प्रतिनिधी, गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महा मंडळाचे कार्यकारी संचालक ऑनलाइन उपस्थित होते.









