ताज्या घडामोडीपिंपरी

‘रामराज्य’ हे आमचे स्वप्न; मंदिर ही आमची अस्मिता ! – राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भावना

Spread the love

 

– लोकनेते स्व. लक्ष्मण जगताप यांच्या पुतळ्याचे अनावरण

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – आपले स्वप्न ‘रामराज्य’चे आहे आणि मंदिर ही आमची अस्मिता आहे. श्रीराम मंदिराच्या उभारणीमुळे देशात यापुढे रामराज्याची संकल्पना पहायला मिळेल. समाजातील सोशित, पीडित, वंचित आहे, त्याला ज्या राज्यामध्ये महत्त्व मिळते, त्याचा आवाज ऐकला जातो, त्याला ‘रामराज्य’ असे म्हटले जाते. छत्रपती शिवाजी महाराज यांचे रयतेचे राज्य रामराज्याच्या संकल्पनेतून उभा राहिले होते, अशा भावना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केल्या.

लोकनेते आमदार स्व. लक्ष्मण जगताप यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. तसेच, ‘फिरते वाचनालय’ चा लोकार्पणही करण्यात आले. तसेच, प्रभू श्रीराम मंदिराची प्रतिकृती देवून उपस्थित मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी राज्याचे आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत, पद्मश्री गिरीश प्रभुणे, चिंचवडच्या आमदार अश्विनी जगताप, भोसरीचे आमदार महेश लांडगे, विधान परिषदेच्या आमदार उमा खापरे, माजी खासदार तथा प्रदेश उपाध्यक्ष अमर साबळे, आमदार भीमराव तापकीर, विश्व हिंदू परिषदेचे दादा वेदक, माजी आमदार जगदीश मुळीक, पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ, माजी महापौर माई ढोरे, उपमहापौर नाणी घुले, माजी राज्यमंत्री तथा प्रदेश कार्यकारिणी सदस्य बाळा भेगडे, पिंपरी-चिंचवडचे आयुक्त शेखर सिंह, धर्मादाय आयुक्त महेंद्र महाजन, राष्ट्रीय आरोग्य अभियानचे सहसंचालक राधाकिशन पवार, जिल्हा शल्य चिकित्सक नागनाथ येपल्ले, महापालिका वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन देसाई, डॉ. वंदना जोशी, डॉ. विजय वाघ, डॉ. दिपक धोत्रे, डॉ. धर्मेंद्र कुमार आदी उपस्थित होते.

यावेळी देशात संस्कारक्षम पिढी घडवण्यासाठी काम करणारी भारतीय विचार साधना संस्थेला मदत म्हणून ‘संस्कारक्षम विचार रथ’ची चावी अध्यक्ष बिपिन पाटसकर यांना सुपूर्द करण्यात आली.

आमदार अश्विनी जगताप म्हणाल्या की, सर्वसामान्य नागरिकांच्या हक्कांसाठी स्वाभिमानाने लढणारे आमदार लक्ष्मण जगताप यांना एका दुर्धर आजाराने आमच्यातून हिरावून घेतले. ‘गोरगरिब नागरिकांना आरोग्य सुविधा मिळावी. उपचार आणि निदानाअभावी कोणीही नागरिक वंचित राहता कामा नये.’ या भावनेतून आम्ही ९ वर्षांपूर्वी ‘अटल महाआरोग्य शिबीर’ या पवित्र कार्याची सुरूवात केली. लाखो लोकांनी आतापर्यंत याचा लाभ घेतला आहे. शहराध्यक्ष शंकर जगताप व स्व. लक्ष्मण जगताप मित्र परिवानाने या शिबिरासाठी प्रचंड मेहनत घेतली आहे.

भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप म्हणाले की, २०१७ मध्ये महापालिकेत भाजपा सत्ता आली. पूर्वी वायसीएम महापालिकेत नियमितपणे १ हजारापर्यंत रुग्णांची तपासणी होत असे. मात्र, भाजपाच्या सत्ताकाळात नियमितपणे ५ हजार रुग्णांची तपासणी केली जात आहे. मोठ्या आजारांवर उपचार करण्यासाठी खासगी रुग्णालयात जावे लागते. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोफत उपचार मिळावेत. या हेतूने अटल महाआरोग्य विनामूल्य शिबीराचे आयोजन केले आहे.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नाना शिवले यांनी केले. आभार विधान परिषदेच्या आमदार उमा खापरे यांनी मानले.

पहिल्या दिवशी ६६ हजार रुग्णांची तपासणी : शहराध्यक्ष शंकर जगताप

भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप म्हणाले की, शिबिरामध्ये आतापर्यंत ऑनलाईन दीड लाख आणि ऑफलाईन ३७ हजार रुग्णांची नोंद झाली आहे. पहिल्या दिवशी ६६ हजार रुग्णांची तपासणी झाली आहे. सुमारे ६५० लोकांचे एक्स-रे, १९५ सोनोग्राफी, सुमारे १५ हजार विद्यार्थ्यांची तपासणी, डायलेसिसच्या सुमारे दीड हजार नागरिकांनी नोंदणी केली असून या पैकी ५०० नागरिकांचे डायलेसिस शिबिरात करण्यात येणार आहे. लोकनेते स्व. लक्ष्मण जगताप यांचा रुग्णसेवेचा वसा आम्ही निरंतरपणे सुरू ठेवणार आहे. स्व. जगताप यांच्याप्रमाणेच जगताप कुटुंबीय भाजपा पक्षनिष्ठा जोपासणार आहे.

लक्ष्मणभाऊ असते, तर मोठा उत्सव केला असता : उपमुख्यमंत्री फडणवीस

अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराचे उद्घाटन होत आहे. हे केवळ मंदिर नाही, ५०० वर्षे जो कलंक आमच्या छातीवर उभा केला होता. ज्या कलंकाला १९९२ साली मिटवले. तरीदेखील आमच्या आराध्य दैवताची स्थापना आम्हाला करता आली नव्हती. ज्या ठिकाणी प्रभू श्रीरामांचा जन्म झाला होता. तिथेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते प्रभूंच्या मंदिराचे लोकार्पण होत आहे. त्यामुळे सर्वत्र मंगलमय वातावरण आहे. आज लोकनेते लक्ष्मण जगताप असते, तर त्यांनीही मोठा उत्सव साजरा केला असता. त्यांचे कार्य सक्षमपणे पुढे नेण्याची शक्ती प्रभू श्रीराम आम्हाला देतील, अशा भावनाही फडणवीस यांनी व्यक्त केल्या.

वाचाळविरांना प्रभूश्रीरामच सुबुद्‍धी देतील : उपमुख्यमंत्री फडणवीस

रामराज्याच्या संकल्पनेमुळे काही लोकांना दु:ख होते. त्यामुळे काही वाचाळवीर राम मांसाहारी होते, असे वाचाळ वक्तव्य करतात. आमचे वारकरी, टाळकरी, धारकरी सर्व बहुजन समाज आहे. सगळे शाकाहारी आहेत. त्यामुळे वाचाळवीरांना प्रभू श्रीराम सुबुद्धी देतील. ‘पुरुषार्थ जागृत करुन वाईट प्रवृत्तीवर आपण विजयी मिळवू शकतो’ अर्थात सामान्यांना सोबत घेवून वाईटाशी लढाई करतो. सामान्यांचा पौरुष जागृत करतो. प्रभू श्रीराम लोकनेते लक्ष्मण जगताप यांचे कार्य पुढे नेण्याची शक्ती आम्हाला देतील, असा विश्वासही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

पिंपरी-चिंचवडच्या विकासात लोकनेते स्व. लक्ष्मण जगताप यांचा मोलाचा वाटा राहिला आहे. त्यांनी सुरू केलेला लोकसेवेचा वारसा आम्ही सक्षमपणे पुढे नेण्याचा प्रयत्न जगताप कुटुंबीयांकडून केला जात आहे. प्रगती मोठ्या प्रमाणात होत आहे. त्याच प्रमाणात आरोग्याच्या समस्याही वाढत आहेत. दुर्दर रोगांचा उपचार महाग होत असल्यामुळे विविध तपासण्या आणि उपचार सर्वसामान्य नागरिकांना मिळाले पाहिजेत. या उद्देशाने हे शिबीर आयोजित केले आहे. महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीला ५ लाख रुपयांपर्यंतचा उपचार मोफत मिळाला पाहिजे. यासाठी महात्मा फुले जनआरोग्य योजनेची व्याप्ती वाढवली आहे. सामान्य माणसाच्या गरजा पूर्ण झाल्या पाहिजेत.
– देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button