‘वारस प्रमाणपत्र’ संदर्भ ग्रंथाचे न्यायमूर्ती अभय ओक यांच्या हस्ते प्रकाशन संपन्न

पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – ”वारसा प्रमाणपत्र’ हे पुस्तक संदर्भग्रंथ म्हणून अतिशय उपयुक्त आहे!’ असे गौरवोद्गार सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश, न्यायमूर्ती अभय ओक यांनी आय एल एस लॉ विधी महाविद्यालय, पुणे येथे व्यक्त केले. पिंपरी – चिंचवडमधील ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. अर्जुन दलाल, प्रा. डाॅ. नीलिमा भडभडे आणि ॲड. हिमांशू सारस्वत लिखित Heirship Certificates (हेअरशिप सर्टिफिकेट्स)
सन १८२७ चा मुंबई विनियम ८ अंतर्गत दिले जाणारे वारसा हक्क प्रमाणपत्र अर्थात ‘वारसा प्रमाणपत्र’ या पुस्तकाचे प्रकाशन करताना अभय ओक बोलत होते. याप्रसंगी इंडियन लॉ सोसायटीच्या डॉ. वैजयंती जोशी, ॲड. श्रीकांत कानिटकर, मुंबई उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीश डॉ. शालिनी जोशी – फणसळकर, विधी महाविद्यालयाच्या प्राचार्या दीपा पातुरकर, हिंद लॉ हाऊसचे गौरव सेठी आणि जतीन सेठी यांची प्रमुख उपस्थिती होती.
न्यायमूर्ती अभय ओक पुढे म्हणाले की, ‘पुस्तकातील लेखन हे विवेचनात्मक असून असे क्वचितच बघायला मिळते, त्यामुळे या पुस्तकाचा सर्व स्तरांवर उपयोग होईल. हे पुस्तक सर्व महसूल अधिकारी आणि स्थानिक स्वराज्य संस्था यांच्यापर्यंत पोहोचले पाहिजे; तसेच संकेतस्थळावर रेवेन्यू अधिकाऱ्यांना वारसा प्रमाणपत्र देण्याच्या अधिकाराबाबत सरकारने फेरविचार करावा!’ कार्यक्रमाची प्रस्तावना दीपा पातुरकर यांनी केली. ॲड. हिमांशू सारस्वत यांनी आपल्या मनोगतात कायद्याचा इतिहास मांडला; तर ॲड. अर्जुन दलाल यांनी या पुस्तकाचा जन्म कसा झाला, पुस्तकात कोणत्या तरतुदी आहेत ते सांगितले. पुस्तकाची व्याप्ती सांगताना कायद्यात कोणती दुरुस्ती आणणे गरजेचे आहे, जेणेकरून सर्वसामान्यांना हा कायदा सुलभ होईल याचा समावेश पुस्तकात केल्याचे त्यांनी नमूद केले. डॉ. नीलिमा भडभडे यांनी सध्या वारसा हक्क प्रमाणपत्र मिळवण्यासाठी लागणारा वेळ आणि त्यासाठी लागणारी भरमसाठ कोर्ट फी यामुळे पक्षकार पळवाटा शोधतात याबद्दल चिंता व्यक्त केली. जेथे संमतीने वारसा हक्क प्रमाणपत्र मिळत असेल तेथे कमी फी आकारावी, जेणेकरून कोणीही पळवाटा शोधणार नाहीत, असेही त्या म्हणाल्या.

पुस्तक प्रकाशनापूर्वी लॉ कॉलेजने संपूर्ण दिवसभर ‘दी इस्टेट ॲडमिनिस्ट्रेशन प्रोसेस : चॅलेंजेस, ऑपर्च्युनिटीज ॲण्ड बेस्ट प्रॅक्टिसेस’ या विषयावर चार सत्रांमध्ये कार्यशाळा आयोजित केली होती. डॉ. नीलिमा भडभडे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या कार्यशाळेचे आयोजन व संयोजन विधी महाविद्यालयाने केले.






