ताज्या घडामोडीपिंपरी

देहूत ३७५ त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी सदेह वैकुंठ गमन वर्षपूर्ती सोहळ्याची सांगता, लाखो भाविकांच्या हरिनाम जयघोषात बीज सोहळा साजरा

Spread the love

देहू,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – तुकाराम तुकाराम । नाम घेता कापे यम ॥१॥
धन्य तुकोबा समर्थ । जेणे केला हा पुरुषार्थ ॥२॥
जळी दगडासहित वह्या । तारीयेल्या जैशा लाह्या ॥३॥
म्हणे रामेश्वरभट द्विजा । तुका विष्णू नाही दुजा ॥४॥

श्री संत तुकाराम महाराज यांचा ३७५ व्या बीज सोहळा राज्य परिसरातून आलेल्या लाखो भाविक वारकरी यांच्या उपस्थितीत हरिनाम जयघोषात श्रींचे सदेह वैकुंठ गमन प्रसंगावर आधारित हभप बापूसाहेब मोरे, महाराज देहूकर यांचे सुश्राव्य हृदयस्पर्शी कीर्तन सेवेने बीज सोहळा नामजयघोषात साजरा झाला.

तत्पूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पुरस्कार देहू देवस्थानचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे, आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजन नाथसाहेब, विश्वस्त डॉ. भावार्थ देखणे, संजय महाराज मोरे, माणिक महाराज मोरे, संतोष महाराज मोरे, विशाल महाराज मोरे, भानुदासमहाराज मोरे, अजय महाराज मोरे, योगीराज महाराज गोसावी, खासदार श्रीरंग बारणे, आमदार शरद सोनवणे, विजय बापू शिवतारे, माजी आमदार विलास लांडे, देहू नगरपंचायत नगराध्यक्षा पूजा दिवटे, मुख्याधिकारी निवेदिता घार्गे, शिवसेना आळंदी शहर प्रमुख राहुल चव्हाण यांचे सह राज्यातून आलेले मान्यवर महाराज, कीर्तनकार, प्रवचनकार, देवस्थानचे विश्वस्त आदी मान्यवर वारकरी, भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

देहूत इंद्रायणी नदी घाट परिसरासह श्रीक्षेत्र देहूत विविध ठिकाणी बीज सोहळया निमित्त हरिनाम गजरात धार्मिक कार्यक्रम परंपरेने झाले. कीर्तन, प्रवचन, गाथा भजन, गाथा पारायण आदी धार्मिक कार्यक्रमांसह अन्नदान मोठ्या प्रमाणात करण्यात आले. मंदिरात भाविकांनी रांगा लावून श्रीचे दर्शन घेतले. ज्ञानोबा – माऊली तुकाराम नामजयघोष करीत भाविकांनी दर्शन घेत जयघोष केला.

इंद्रायणी नदी घाटावर, संत तुकाराम महाराज मंदिर, गाथा मंदिर आणि श्री वैकुंठ गमन स्थान मंदिर येथे भाविकांची मोठी गर्दी झाली आहे. भाविकांनी इंद्रायणी नदी घाटावर स्नानास गर्दी केली असून तीर्थक्षेत्री स्नान माहात्म्य जोपासले जात आहे.

देहू नगरपंचायतीने विविध सेवा सुविधा उपलब्ध करून दिल्या असून पिण्याचे पाणी, आरोग्य सेवा, स्वच्छता प्रभावी पणे उपलब्ध करून दिल्या आहेत. देहूत सीसीटीव्हि यंत्रणा तसेच पब्लिक ऍड्रेस सिस्टएम प्रभावी पणे विकसित केली असून भाविक नागरिकांची गैरसोय होणार नाही याची दक्षता मुख्याधिकारी निवेदिता घार्गे, नगराध्यक्षा पूजा दिवटे यांनी घेतली. यासाठी नगरपंचायत पदाधीकारी, महसूल, आरोग्य सेवा प्रशासन, पोलीस प्रशासन आणि देहू देवस्थान यांनी सुसंवाद ठेवून नियोजन केले आहे. पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून भाविक आणि मंदिर परिसरात सुरक्षितता राहण्याचे दृष्टीने पोलीस तसेच पोलीस मित्र कार्यरत आहेत. घाटावर तसेच मंदिरात भाविकांनी रांगा लावून श्रीचे दर्शन घेतले. देहू परिसरात महिला, पुरुष भाविकांचे गर्दीने रस्ते फुलले होते.

देहू येथील संदेश वैकुंठगमन स्थान मंदिर येथील नंदुरकीचे वृक्ष प्रांगणात हभप. बापूसाहेब महाराज मोरे देहूकर यांचे बीज सोहळ्यात हरिनाम गजरात सुश्राव्य कीर्तन झाले. यावर्षी श्री संत तुकाराम महाराज सदेह वैकुंठ गमन ३७५ वर्षपूर्ती सोहळ्याची सांगता मोठ्या भव्य दिव्य प्रमाणात झाली.

यावेळी मंदिर परिसरात लक्षवेधी पुष्प सजावट आणि विद्युत रोषणाई कार्यात आली होती. यावर्षी सोहळ्यात सुमारे ८ लाखावर भाविकांची उपस्थिती असल्याचे देहूतील भाविक शंकरराव हगवणे यांनी सांगितले. देहू नगरपंचायत, देहू देवस्थान, पोलीस प्रशासन, महसूल प्रशासन, आरोग्य सेवा प्रशासन, सार्वजनिक बस वाहतूक प्रशासन यांनी सुसंवाद ठेवत सोहळ्याचे नियोजन केले. यामुळे नागरी सेवा सुविधा प्रभावी राहिल्याचे माऊली घुंडरे पाटील यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button