प्रवृत्ती निवृत्तीची कावड केवळ तुकोबांनी पेलली – हभप एकनाथ महाराज सदगीर


प्रवृत्ती निवृत्तीची कावड केवळ तुकोबांनी पेलली


संत तुकाराम महाराज त्रिशतकोत्तर अमृतमहोत्सवी वैकुंठगमन सोहळा

पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – आयुष्यात प्रवृत्ती आणि निवृत्तीची कावड यांचे संतुलन ज्यांना राखता आले, ते संत तुकाराम महाराज हे एकमेव संत म्हणता येतील, असे प्रतिपादन हभप एकनाथ महाराज सदगीर यांनी केले.
श्री जगद्गुरु संत तुकाराम महाराज त्रिशतकोत्तर अमृतमहोत्सवी वैकुंठगमन सोहळ्यानिमित्त आयोजित गाथा पाराण आणि कीर्तन सोहळ्यात अभंगाचे निरूपण करताना ते बोलत होते.
प्रवृत्तिनिवृत्तीचे आटूनियां भाग ।
उतरिलें चांग रसायण ॥१॥
या अभंगावर सदगीर महाराज यांनी कीर्तन केले. प्रवृत्ती लक्षण आणि निवृत्ती लक्षण या दोन्ही धर्माचे भाग एकत्र आटवून, त्याचे अनुष्ठान करून त्यापासून चांगले भक्ती रसायन तयार केले; आणि जेव्हा ते परीक्षा करून उत्तम झाल्याचे ठरले, तेव्हा आत्मसाक्षात्कार होण्याकरता ज्ञानरूपी अग्निवर व्यवस्थितपणे तापवले. त्यानंतर ब्रह्माचे ठिकाणी अभेदाने राहणाऱ्या ब्रह्मानंदाचा पाक तयार झाला, तेव्हा अनुभवाच्या मुखाने त्याची चव घेतली.
विविध दृष्टांताच्या माध्यमातून त्यांनी सिद्धांत श्रोत्यांपर्यंत पोहोचवला. महाराज म्हणाले की, जीवनामध्ये प्रवृत्ती साधायला गेले, की निवृत्ती बिघडते आणि निवृत्ती साधायला गेले की प्रवृत्ती बिघडते. प्रवृत्ती म्हणजे संसार, त्याला खूप पाय फुटलेले असतात, असे आपण पाहतो. निवृत्तीमध्ये एकांत, मौन, भस्म परिधान करणे अशा गोष्टी असतात. हा निवृत्तीचा अतिरेक असतो. जगद्गुरु तुकोबारायांनी प्रवृत्ती निवृत्तीची कावड खांद्यावर घेऊन त्याचे संतुलन साधले. असे संतुलन साधणारे तुकोबाराय एकमेवाद्वितीय संत होऊन गेले.
सदगीर महाराज म्हणाले की, आपल्याकडे दोन वर्ग आढळतात एक “प “वर्ग आणि दुसरा अपवर्ग. प वर्गामध्ये प फ भ भ म असे वर्ण येतात प म्हणजे पाप-पुण्य, फ म्हणजे फलाशा, ब म्हणजे बंध, भ म्हणजे भय, म म्हणजे मरण. तर अपवर्गामध्ये यापैकी काहीही नसते. संतांच्या दुकानांमध्ये भक्ती आणि मुक्ती दोन्हीही फुकट मिळत असतात. ज्याला हे माहितीये त्याने ते घ्यावे. मात्र या संताच्या दारी भक्ती, ज्ञान, विवेक आणि वैराग्य हे विकत घ्यावे लागते.
सदगीर महाराज म्हणाले की, वेदांचे मनोगत व्यासांना कळाले. व्यासांचे मनोगत शंकराचार्य यांना कळाले. त्यांचे मनोगत ज्ञानोबारायांना कळाले आणि ज्ञानोबारायांचे मनोगत तुकोबारायांना कळाले. म्हणजे वेदातून महाभारतात, त्यातून गीतेत, गीतेतून ज्ञानेश्वरीत, ज्ञानेश्वरीतून गाथेत आणि गाथेतून थेट माथ्यात असा हा प्रवास आहे. प्रवृत्ती आणि निवृत्ती दोन्हीही करायला गेले तर तेलही गेले आणि तूपही गेले हाती आली धुपाटणे अशी अवस्था होते. संत तुकाराम महाराजांनी सुरुवातीचे २१ वर्ष संसार आणि नंतर पुढचे २१ वर्षे परमार्थ केला, पण दोन्हीचेही संतुलन राखले.
महाराज म्हणाले की, स्वतः स्वतः पुढे हरतो त्याला म्हणतात भोगी. स्वतः स्वतःला त्यागतो त्याला म्हणतात त्यागी. स्वतः स्वतःची जिरवतो तो असतो विरक्त, स्वतःच स्वतःला पाहतो तो द्रष्टा. स्वतः स्वतःचे निरीक्षण करतो तो साक्षी, स्वतः स्वतःवर राज्य करतो तो मुक्त, स्वतः स्वतःला विसरतो तो भक्त आणि स्वतःला मिळाला ते ज्ञान जगाला देत फिरतो त्याला म्हणतात संत.
गरीब कष्ट करतो, श्रीमंत त्याचे शोषण करतो, चोर दोघांच्याही घरी चोरी करतो, डॉक्टर तिघांकडूनही बिल वसूल करतो, वकील चौघांनाही गुमराह करतो , नेता पाचही जणांवर राज्य करतो, स्मशानवाला सहाही जणांना जाळतो, पण संत सातही जणांना मुक्ती देतात.
संतांनी लोकांच्या दृष्टीने संसार केला म्हणजे प्रवृत्ती मार्गाने पण गेले आणि निवृत्तीचे शिखर गाठले. नंतर दोघांनाही आटवून चांगले रसायन तयार केले, ते भक्ती रसायन आपण सेवन करावे.
सदगीर महाराजांनी सांगितले की, नास्तिकामध्ये देह बुद्धी असते, आस्तिकामध्ये जीव बुद्धी असते, योग्याजवळ आत्मबुद्धी असते आणि संतांजवळ ब्रह्म बुद्धी असते. संतांनी चांगले रसायन करून आपणाला दिले परंतु आता सध्या समाजामध्ये तीन प्रकारची विषारी रसायन आहेत.
मोबाईल हे मुलांसाठी विषारी रसायन
मुलांसाठी विषारी रसायन म्हणजे मोबाईल म्हणून तेरा वर्षापर्यंत मोबाईल मुलांना देऊ नये. मुलींसाठी लव्ह जिहाद किंवा चित्रपट हे विषारी रसायन आहे आणि विवाहित स्त्रियांसाठी मालिका हे विषारी रसायन आहे. या तीनही विषारी रसायनांपासून आपण वेगळं रहावं, सावध राहावं असं सांगून महाराज म्हणाले या तिनही विषारी रसायनांपासून वाचायचे असेल तर त्यावर संत वाङमय हेच उत्तर आहे.
तुकोबारायांची चरित्र कथा
गाथा सप्ताह सोहळ्यात ज्ञानेश्वर महाराज कदम (छोटे माऊली) यांनी संत तुकाराम महाराज यांचे चरित्रकथन केले. तुकाराम महाराजांची कौटुंबिक पार्श्वभूमी, तुकोबांनी केलेल्या परमार्थाचे अनेक दाखले त्यांनी दिले. कर्जामुळे, आर्थिक बिकट परिस्थितीमुळे आलेले दारिद्र्य मात्र तरीही केलेली विठ्ठलाची भक्ती आणि त्यातील एकरूपतेमुळे आलेली बौद्धिक सधनता, श्रीमंती याला मात्र तोड नव्हती. अशी अनेक सोदाहरणे त्यांनी चरित्रकथनातून स्पष्ट करून सांगितली.










