बालवाडीतील मुलांना समृद्ध शिक्षणाचा अनुभव देण्यासाठी विविध उपक्रमांची अंमलबजावणी
हस्तपुस्तिका, कार्यशाळा, मास्टर ट्रेनर्ससारख्या विविध उपक्रमांमुळे शिक्षणात आली सुसूत्रता


पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड पालिकेच्या बालवाड्यांमध्ये शिक्षणाचा अनुभव अधिक प्रभावी आणि समृद्ध करण्यासाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत. यामध्ये शिक्षिकांनी बनवलेली हस्तपुस्तिका, बालवाडी शिक्षिकांसाठी विशेष कार्यशाळा, मास्टर ट्रेनर निवड, आणि क्लस्टर मिटिंग्सच्या माध्यमातून बालवाडी शिक्षणात एकसूत्रता आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहे.


बालवाडी वर्गांसाठी शिक्षिकांनी शिक्षिकांसाठी बनवलेली हस्तपुस्तिका हा महत्वाकांक्षी उपक्रम ठरत आहे. दोन वर्षांपुर्वी बालवाडी समन्वयकांशी चर्चा करून शिक्षिकांची निवड करण्यात आली. त्यामध्ये तीन विभागांमधून ५० शिक्षिकांचा संघ तयार झाला. विविध संस्थांच्या आणि अभ्यासक्रमांच्या मदतीने बालवाडी शिक्षण अधिक प्रभावी करण्यासाठी या शिक्षिकांनी प्रयत्न सुरू केले.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेसोबत कार्य करणाऱ्या संस्था आणि आकांक्षा फाउंडेशनच्या अभ्यासक्रम टीमसोबत चर्चा करून या शिक्षिकांनी एक विशेष हस्तपुस्तिका तयार केली. ही हस्तपुस्तिका सर्व शिक्षिकांना वितरित करण्यात आली आणि तिच्या आधारे प्रत्येक बालवाडी वर्गात एकसारखा अभ्यासक्रम राबवण्यात येत आहे. या माध्यमातून शिक्षण अधिक संरचित आणि परिणामकारक होत आहे.
चौकट – दर महिन्याला कार्यशाळा व क्लस्टर मिटिंग्स
प्रत्येक महिन्यात बालकांच्या शारीरिक, भाषा, गणनपूर्व आणि सामाजिक भावनिक विकासासाठी कार्यशाळा घेतल्या जातात. या कार्यशाळांमध्ये शिक्षिकांना प्रत्यक्ष डेमोद्वारे प्रशिक्षण दिले जाते. गेल्या दोन वर्षांपासून दरमहा तीन तासांच्या कार्यशाळांमुळे बालकांमध्ये सकारात्मक बदल दिसून येत आहेत.
चौकट – मास्टर ट्रेनर व समन्वयकांचा सहभाग
बालवाड्यांमधील सर्व शिक्षिकांपर्यंत हे ज्ञान पोहोचावे म्हणून ८ विभागांमधून प्रत्येकी २ अशा १६ मास्टर ट्रेनर्सची निवड करण्यात आली आहे. त्यांच्याद्वारे शिक्षकांना प्रशिक्षण घेऊन ८ क्लस्टर मिटिंग्स सुरू करण्यात आल्या आहेत. यामध्ये समन्वयकांचा सक्रिय सहभाग असून विविध शाळांच्या भेटी देऊन शिक्षिकांना सहकार्य आणि बालकांना शैक्षणिक योजनांचा लाभ मिळवून देण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
चौकट – विविध उपक्रमांमुळे बालवाड्यांमध्ये झालेले सकारात्मक बदल
बालवाड्यांमध्ये एकसंध अभ्यासक्रम लागू
नवीन शिक्षिकांची निवड आणि ९ समन्वयकांची नियुक्ती
२११ शिक्षिकांसाठी अभ्यासक्रम दौऱ्यांचे आयोजन
क्लस्टर मिटिंग्सची प्रभावी अंमलबजावणी
दर ३ महिन्यांनी बालकांचे निरीक्षण व नोंदणी
पालकांचा सहभाग वाढविण्यासाठी नियमित पालकसभांचे आयोजन
हस्तपुस्तिका, कार्यशाळा, मास्टर ट्रेनर्सची निवड, क्लस्टर मिटींग्स, समन्वयकांची निवड अशा विविध उपक्रमांद्वारे बालवाडीमधील शिक्षिकांना मदत होत असून बालकांना एकसंध, दर्जेदार आणि सर्वसमावेशक शिक्षण मिळत आहे. आपण सर्व एकमेकांसाठी एकत्र (We are together for each other) या तत्त्वावर आधारित हा उपक्रम भविष्यातही अधिक प्रभावीपणे राबवण्याचा महापालिकेचा संकल्प आहे.
– प्रदीप जांभळे पाटील, अतिरिक्त आयुक्त (१), पिंपरी चिंचवड महापालिका










