पेठ क्र. ५ आणि ८ येथील ताब्यात आलेल्या जागेत छत्रपती संभाजी महाराज यांचा १०० फुट उंच पुतळा उभारण्याच्या विषयांस स्थायी समितीची मान्यता


पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – प्रभाग क्र. २ बोऱ्हाडेवाडी, मोशी प्राधिकरण येथील पेठ क्र. ५ आणि ८ येथील ताब्यात आलेल्या जागेत छत्रपती संभाजी महाराज यांचा १०० फुट उंच पुतळा उभारण्याच्या विषयासह पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सर्व शाळांमध्ये एसइइ लर्निंग प्रकल्प राबविण्यासाठी हिमालयन इन्स्टिट्यूट ऑफ अल्ट्ररनेटिव्स लडाख येथे अभ्यासदौरा आयोजित करण्याबाबतच्या विषयास प्रशासक शेखर सिंह यांनी आज झालेल्या बैठकीत मान्यता दिली.


पिंपरी येथील महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनातील दिवंगत महापौर मधुकरराव पवळे सभागृहात स्थायी समिती सभेची मान्यता आवश्यक असणारे विविध विषय प्रशासक शेखर सिंह यांच्या मान्यतेसाठी ठेवण्यात आले होते. यावेळी विविध विषयांना प्रशासक शेखर सिंह यांनी मान्यता दिली. या स्थायी समिती सभेत अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, चंद्रकांत इंदलकर यांच्यासह संबंधित विभागांचे विभाग प्रमुख आणि अधिकारी उपस्थित होते.

केशवनगर, चिंचवड येथील विद्युत दाहिनीची ३ वर्षासाठी देखभाल दुरुस्ती करणे, महापालिकेच्या सार्वजनिक आणि सामुदायिक शौचालयाच्या स्वच्छता आणि देखभाल दुरुस्तीसाठी येणाऱ्या खर्चास मान्यता देणे, महापालिकेच्या प्रभाग क्र. २६ येथील कस्पटेवस्ती, कावेरीनगर, वेणूनगर व इतर परिसरातील रस्ते डब्ल्यूएमएम आणि एमपीएम या पद्धतीने विकसित करण्याच्या विषयास प्रशासक शेखर सिंह यांनी मान्यता दिली.
महापालिकेचा पिंपरी येथील प्रभाग क्र. २१ येथील फूटपाथ, पावसाळी गटर्स व नाल्यांची दुरुस्ती करणे, प्रभाग क्र. १० छत्रपती संभाजीनगर येथील साई उद्यानासाठी टेन्साईल रुफिंग करणे आणि स्थापत्य विषयक कामे करणे, प्रभाग क्र १ मधील शाळा परिसरातील अंतर्गत रस्त्यांची आकस्मिक देखभाल दुरुस्ती करण्याच्या विषयासह प्रभाग क्र. १३ मध्ये अमृतानंदमयी मठ परिसरात विविध ठिकाणी रस्त्याचे हॉटमिक्स पद्धतीने डांबरीकरण करणे, प्रभाग क्र. ११ मधील समृध्दी पार्क व शरदनगर परिसरातील रस्त्यांची देखभाल दुरुस्ती आणि डांबरीकरण करणे, क क्षेत्रीय कार्यालयात क्रीडा विभागाकडील स्थापत्य विषयक आवश्यक कामे करण्याच्या विषयासह विविध विषयांना प्रशासक शेखर सिंह यांनी स्थायी समिती सभेत मान्यता दिली.
शहरातील वापरात नसलेले किंवा दुरावस्थेत अथवा मोडकीस अवस्थेत असणारे सार्वजनिक व सामुदायिक शौचालयाचा सर्व्हे करुन निष्कासित करण्याच्या विषयास महापालिका सभेत प्रशासक शेखर सिंह यांनी मान्यता दिली.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळांमधील सर्व विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी आणि विद्यार्थ्यांमध्ये मानसिक, भावनिक, सामाजिक, राष्ट्रीय जाणीव निर्माण व्हावी यासाठी एसइइ लर्निंग socio emotional and ethical life skill learning ) हा नवीन प्रकल्प निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला असून २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात राबविण्यात येणार आहे. या अभ्यासदौऱ्यात आयुक्त अतिरिक्त आयुक्त १, सहाय्यक आयुक्त , प्रशासन अधिकारी , शिक्षण विभाग, एसइइ लर्निंग मास्टर ट्रेनर समितीमधील २० ते २५ शिक्षक , ३ एनजीओ प्रतिनिधी, व प्राथमिक शिक्षण विभागातील १ कर्मचारी असे ३० अधिकारी कर्मचारी अभ्यासदौऱ्यात सहभागी होणार आहे. या प्रकल्पासाठी आयुक्त शेखर सिंह यांच्या संकल्पनेनुसार एका नवीन समितीची स्थापना करण्यात येणार असून २० ते २५ शिक्षकांची निवड एसइइ लर्निंग मास्टर ट्रेनर म्हणून सहाय्यक आयुक्त , शिक्षण विभाग यांच्या नियंत्रणाखाली समितीची निवड प्रक्रिया करण्यात येणार आहे. या ६ दिवसाच्या अभ्यासदौऱ्यासाठी येणाऱ्या खर्चास प्रशासक शेखर सिंह यांनी स्थायी समिती सभेत मान्यता दिली.
प्रभाग क्र. २ बोऱ्हाडेवाडी मोशी प्राधिकरण येथील पेठ क्र. ५ आणि ८ (पुणे आंतरराष्ट्रीय प्रदर्शनी आणि कन्वेन्शन सेंटर PIECC) येथील १०,११७.१४ चौरस मीटर (२.५ एकर) जागेचा आगाऊ ताबा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्टॅच्यु ऑफ हिंदुभूषण स्मारकासाठी देण्यात आला आहे. तथापि महाराष्ट्र शासन यांच्याकडील शासन निर्णयानुसार राष्ट्रपुरुष, थोर व्यक्ती यांचा पुतळा उभारण्यासाठी मान्यता देण्याचा अधिकार जिल्हाधिकारी यांना प्रदान करण्यात आला असून त्यानुषंगाने प्राधिकरण पेठ क्र. ५ आणि ८ येथील महापालिकेच्या ताब्यात देण्यात आलेल्या जागेवर छत्रपती संभाजी महाराज यांचा १०० फुट उंच पुतळा उभारण्याच्या ठरावास प्रशासक शेखर सिंह यांनी बैठकीत मान्यता दिली.










