मुंबईसाठी बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांचा भाजप आणि आरएसएसकडून अपमान – शहरप्रमुख संजोग वाघेरे पाटील
भैय्याजी जोशी यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने पिंपरीत जोडे मारो आंदोलन


मुंबई महाराष्ट्रापासून तोडून गुजरातला जोडण्याचा भाजप आणि संघाचे षडयंत्र – माजी आमदार गौतम चाबुकस्वार


पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – राज्यात सध्या कोणीही उठतो आणि महाराष्ट्रातील थोर महापुरुष आणि मराठी भाषेविषयी सातत्याने अपमानास्पद वक्तव्य करतो. असा अपमान होत असतानाही राज्यातील भारतीय जनता पक्ष आणि मित्रपक्षाचे सरकार गप्प का आहे? आपली मुंबई महाराष्ट्रात राहावी यासाठी हौतात्म्य पत्करणाऱ्या त्या प्रत्येक हुतात्म्यांचा अपमान हे भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे लोक जाणूनबुजून करीत आहेत, असा घणाघाती आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पिंपरी चिंचवड शहरप्रमुख संजोग वाघेरे पाटील यांनी केला आहे.

घाटकोपर येथे एका कार्यक्रमात बोलताना भय्याजी जोशी यांनी मुंबईच्या विविधतेतील एकतेवर भाष्य केले होते. ‘मुंबईत विविध राज्य, प्रांत आणि भाषा बोलणारे नागरिक राहतात. येथे अनेक भाषा आहेत आणि घाटकोपरची भाषा गुजराती आहे, गिरगावची भाषा हिंदी आहे. त्यामुळे मुंबईत येणाऱ्या प्रत्येकाला मराठी भाषा शिकली पाहिजे, असे नाही,’ असे वक्तव्य त्यांनी केले होते. त्याचे पडसाद आज पिंपरी चिंचवड शहरात उमटले. पिंपरी चिंचवड शहर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने आज (शुक्रवारी) सकाळी पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा या ठिकाणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वरिष्ठ नेते भय्याजी जोशी यांच्या प्रतिमेला जोडे मारून त्यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला.
यावेळी पक्षाचे शहरप्रमुख संजोग वाघेरे पाटील, जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार ऍड. गौतम चाबुकस्वार, शहर संघटिका अनिता तुतारे, युवा सेना अध्यक्ष चेतन पवार, उपजिल्हाप्रमुख रोमी संधू, उपजिल्हा प्रमुख हाजी मणियार, उपशहरप्रमुख हरेश नखाते, पिंपरी विधानसभा प्रमुख तुषार नवले, माजी नगरसेविका मीनल यादव, विशाल नाचपल्ले, यांच्यासह शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आजी माजी नगरसेवक, पदाधिकारी, युवा सेना, महिला आघाडी, शिवदूत, शिवसेना संलग्न विविध संघटनांचे पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना संजोग वाघेरे पाटील म्हणाले की, महाराष्ट्रातील महापुरुष आणि मराठी भाषेचा सातत्याने अपमान होत असताना राज्यातील सरकारमध्ये असणारे भाजप आणि मित्रपक्ष गप्प का आहेत? मुंबई महाराष्ट्रात आणण्यासाठी अनेक हुतात्म्यांनी प्राणांचे बलिदान दिले. हा त्या हुतात्म्यांचा अपमान आहे. महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येक परप्रांतीयाने मराठी भाषेचा अभिमान बाळगायला हवाच. अशा पद्धतीने सातत्याने अपमान करणाऱ्यांविरोधात सरकारने कठोर कायदा अस्तित्वात आणावा अशी मागणी, त्यांनी यावेळी केली.
माजी आमदार ऍड. गौतम चाबुकस्वार म्हणाले की, मुंबई महाराष्ट्रापासून तोडून गुजरातला जोडण्याचा बीजेपी – आरएसएसचा कुटील डाव आहे. सातत्याने भाजप आणि आरएसएस यांच्याशी संलग्न असणारे महाराष्ट्राचे महापुरुष आणि मराठी भाषेचा जाणूनबुजून अपमान करतात. मुंबईचे जागतिक महत्व कमी करण्याचा त्यांचा प्रयत्न आम्ही शिवसैनिक कदापी यशस्वी होऊ देणार नाही. मराठी भाषेच्या बहुमान राखण्यासाठी आम्ही सातत्याने संघर्ष करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.










