ताज्या घडामोडीपिंपरी

भोसरीतील गुडविल चौकात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने जपली स्वच्छतेबरोबर सुंदरता

आरोग्य विभागाने स्वच्छ सर्वेक्षण २०२४ अंतर्गत स्वच्छता मोहीम घेतली हाती

Spread the love

पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महानगरपालिका स्वच्छतेबरोबर शहरातील सार्वजनिक जागा कचरामुक्त करून त्या कल्पकतेने सजवण्यास प्राधान्य देत आहे. भोसरी येथील हुतात्मा विजय साळसकर मार्गावरील गुडविल चौकात सार्वजनिक जागी टाकण्यात येणाऱ्या कचऱ्याची समस्या सोडवण्यासाठी येथील सार्वजनिक जागेचे महानगरपालिकेकडून सुशोभिकरण करण्यात आले आहे. महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने हे काम करण्यात आले आहे.

महानगरपालिकेच्या ‘ह’ क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत प्रभाग क्रमांक २० येथील हुतात्मा विजय साळसकर मार्गावर गुडविल चौक आहे. या चौकाजवळ असणारी सार्वजनिक जागा कचरायुक्त झाली होती. ती जागा आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांकडून कचऱ्यातील टाकाऊ वस्तूंचा वापर करून कल्पकतेने सजवण्यात आली असून ती कचरामुक्त करण्यात आली आहे. या परिसराचे सुशोभिकरण करण्यात आले असून त्यासाठी टायर, तुटलेले पाईप, प्लास्टिक बॉटल्स, दगड इत्यादी वस्तूंचा वापर करण्यात आला आहे. त्याच बरोबर येथील दगडांना विविध रंग देण्यात आल्याने हा परिसर लक्षवेधी ठरत आहे. नागरिक देखील आरोग्य विभागाच्या या कामाबाबत समाधान व्यक्त करीत आहेत.

दरम्यान, पिंपरी चिंचवड शहरामध्ये ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२४’ सुरू आहे. या स्वच्छ सर्वेक्षणमध्ये पिंपरी चिंचवड शहराला अव्वल क्रमांक मिळावा, यासाठी महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह , अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागाचे उप आयुक्त सचिन पवार यांच्यासह आरोग्य विभागातील इतर अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button