लोकशिक्षक बाबा भारती जीवन गौरव सन्मान पुरस्कार प्रदान सोहळा महात्मा फुले महाविद्यालयात संपन्न


पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महात्मा फुले महाविद्यालय, पिंपरी व लोकशिक्षक बाबा भारती प्रतिष्ठान, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने लोकशिक्षक बाबा भारती जीवन गौरव सन्मान पुरस्कार प्रदान सोहळा संपन्न झाला.


या कार्यक्रमासाठी पद्मश्री गिरीश प्रभुणे,डॉ. श्रीपाल सबनीस, विश्वास मोरे, पितांबर लोहार, कृषिभूषण सुदाम भोरे, ऍड. सतीश गोरडे, प्रदीप गंधालीकर, लोकशिक्षक बाबा भारती प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेंद्र भारती, महाराष्ट्र साहित्य परिषद, भोसरीचे कार्याध्यक्ष पुरुषोत्तम सदाफुले, प्राचार्य प्रो.(डॉ.) पांडुरंग भोसले आदी उपस्थित होते.

मान्यवरांच्या हस्ते कर्मवीर भाऊराव पाटील आणि लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक लोकशिक्षक बाबा भारती प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेंद्र भारती यांनी केले. आपल्या प्रास्ताविकातून त्यांनी संस्थेमार्फत दिल्या जाणाऱ्या विविध पुरस्कारांमागील भूमिका विशद करत यावर्षीचा लोकशिक्षक बाबा भारती जीवनगौरव पुरस्कार पद्मश्री गिरीश प्रभुणे यांना प्रदान करण्यात येत असल्याचे जाहीर केले.
प्रो. डॉ. कामायनी सुर्वे यांनी पद्मश्री गिरीश प्रभुणे यांना देण्यात येणाऱ्या मानपत्राचे वाचन केले आणि त्यानंतर डॉ. श्रीपाल सबनीस, महेंद्र भारती, पुरुषोत्तम सदाफुले, प्राचार्य प्रो. डॉ. पांडुरंग भोसले या मान्यवरांच्या हस्ते पद्मश्री गिरीश प्रभुणे यांना पगडी, स्मृतिचिन्ह, मानपत्र, ग्रंथ आणि स्नेहवस्त्र प्रदान करण्यात येऊन सन्मानित करण्यात आले. यानंतर पद्मश्री गिरीश प्रभुणे आणि डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते प्राचार्य प्रो. डॉ. पांडुरंग भोसले यांना शिक्षक प्रतिभा पुरस्कार, ऍड. सतीश गोरडे यांना कायदेभूषण पुरस्कार, प्रदीप गंधालीकर यांना शब्दप्रतिमा पुरस्कार, कवयित्री शोभा जोशी यांना काव्यप्रतिमा पुरस्कार, कवयित्री राधाबाई वाघमारे यांना काव्य साधना पुरस्कार, कवी सागर काकडे यांना साहित्य पुरस्कार प्रदान करण्यात आले.
याप्रसंगी कवयित्री शोभा जोशी यांनी ‘शिक्षण पूर्ण झाल्या बिगर लगीनं नाही मला करायचं’ ही कविता गायन करून सर्व मुलींनी उच्चशिक्षित झाले पाहिजे असे मत व्यक्त केले. तर “साहित्यामुळे मी माणसे वाचण्यासाठी शिकलो.” असे मत लेखक, निवेदक मा. प्रदीप गांधलीकर यांनी व्यक्त केले. कवयित्री राधाबाई वाघमारे यांनी आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देताना अण्णा हजारे यांना कविता ऐकवली त्याबद्दल आपला अनुभव सांगितला व ‘उरले सुरले आवरून घेऊ’ ही कविता गायन करून अवयदान किती महत्त्वाचे असते त्यातून एखाद्या जिवाचा प्राण वाचतो बरेच लोक आपले अवयव दान करत नाही हे चुकीचे आहे सर्वांनी अवयदान करावे असे आव्हान विद्यार्थ्यांना केले.
‘वकील आपल्या दारात’ या उक्तीप्रमाणे कायदेविषयक सल्ले देऊन गोरगरिबांच्या आयुष्य उज्वल कसे करता येईल हा आमचा ध्यास असतो असे मत ॲड. सतिश गोरडे यांनी व्यक्त केले.
रयत शिक्षण संस्थेमार्फत कितीतरी विद्यार्थी आपले आयुष्य घडवत असतात शिक्षणाने आपले आयुष्य उज्वल होत असते असे मत मा. सुदाम घोडे यांनी व्यक्त केले.’बाप नेमका काय असतो’ या कवितेतून वडिलांची कामगिरी मुलांसाठी किती महत्त्वाची असते याविषयी मत कवी सागर काकडे यांनी व्यक्त केले.
साहित्य लेखनातून माणसाच्या आयुष्याचे अनुभव चित्र उलगडत असते साहित्य साधना माणसाला घडवत असते असे मत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पांडुरंग भोसले यांनी व्यक्त केले.
समाजात दिन दलितांच्या गरीब मुलांना शिक्षण देऊन बाबा भारती यांनी मोलाची कामगिरी केलेली आहे असे मत कार्यक्रमाचे अध्यक्ष जेष्ठ वृत्त संपादक विश्वास मोरे यांनी व्यक्त केले.
कर्मवीर भाऊराव पाटील यांचा आदर्श समोर ठेवून त्यांच्या कार्याच्या प्रेरणेने मला माझे आयुष्य घडविता आले.आज देशामध्ये गरीब मुले, देहविक्री करणाऱ्या स्त्रिया व तळागाळातील समाज यांच्यासाठी शिक्षण हेच आपली वैचारिक व आर्थिक परिस्थिती सुधारण्याचे माध्यम आहे. सर्व विद्यार्थ्यांनी शिक्षण घ्यावे शिक्षणापासून कोणी वंचित राहू नये असे आव्हान ज्येष्ठ समाज सुधारक, पद्मश्री गिरीश प्रभुणे यांनी केले.
समाजाला एकरूप ठेवणे महत्त्वाचे असते समाजात वेगवेगळ्या विचारधारेची लोक असू शकतात परंतु शांततेच्या मार्गाने देशाचा विकास होतो. बाबा भारती यांनी मानव धर्माचे उपासक बनून खूप मोलाची कामगिरी केलेली आहे. असे मत डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महेंद्र भारती यांनी केले तर सूत्रसंचालन सौ. सीमाताई गांधी यांनी केले. कार्यक्रमाचे आभार बाजीराव सातपुते यांनी केले. कार्यक्रमासाठी लोकशिक्षक बाबा भारती प्रतिष्ठानचे सदस्य आणि महात्मा फुले महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.










