सोहम् ग्रंथालयात मराठी भाषा गौरवदिन साजरा


पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – सोहम् सार्वजनिक ग्रंथाल्याच्या वतीने पिंपरीत मराठी भाषा गौरवदिनानिमित्त सेवानिवृत्त शिक्षिका आणि ज्येष्ठ नागरिक महासंघाच्या विद्यमान अध्यक्षा वृषाली मरळ यांना मानपत्र प्रदान करून गौरविण्यात आले. ज्येष्ठ नागरिक महासंघाचे माजी अध्यक्ष ईश्वरलाल चौधरी, सरचिटणीस अरुण बागडे, संत तुकाराममहाराज प्रतिष्ठानचे अध्यक्ष नंदू कदम, सोहम् ग्रंथालयाचे संस्थापक – अध्यक्ष जगन्नाथ नेरकर यांची व्यासपीठावर आणि स्पर्धा परीक्षांचे विद्यार्थी यांची सभागृहात उपस्थिती होती.


सन्मानचिन्ह, मानपत्र, शाल, ग्रंथ आणि गुलाबपुष्प असे सन्मानाचे स्वरूप होते. याप्रसंगी सोहम् ग्रंथालयाच्या अभ्यासिकेतून स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी होत वेगवेगळ्या पदांवर नियुक्ती प्राप्त केलेल्या पुरुषोत्तम ढेपे आणि ओंकार जगदाळे या युवा अधिकाऱ्यांना सन्मानचिन्ह, शाल, ग्रंथ आणि गुलाबपुष्प प्रदान करून सन्मानित करण्यात आले. सत्काराला उत्तर देताना वृषाली मरळ यांनी, ‘पती निधनानंतर अनेक अडचणींवर मात करीत मुलगा आणि मुलीला उच्चशिक्षित केले. अभियंता असलेला मुलगा अमेरिकेत स्थायिक झाला आहे; तर मुलगी यशस्वी उद्योजिका आहे. सेवानिवृत्तीनंतर ज्येष्ठ नागरिक महासंघात विविध पदांवर काम करीत आता अध्यक्षपदाची जबाबदारी पार पाडत आहे. परिस्थितीशी संघर्ष केला तर समाजात उल्लेखनीय कार्य करता येते!’ अशी भावना व्यक्त केली. पुरुषोत्तम ढेपे यांनी, ‘स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असताना अनेकांनी नकारात्मक सल्ले देत हतोत्साहित करण्याचा प्रयत्न केला; पण आत्मविश्वास आणि प्रयत्नातील सातत्य या बळावर अधिकारपदाची नोकरी मिळविण्यात यशस्वी झालो!’ अशा शब्दांत आपल्या यशाचे गमक कथन केले. अरुण बागडे यांनी आपल्या सविस्तर मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना यशप्राप्तीचे विविध पर्याय सांगितले.

दीपप्रज्वलन, कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन आणि महाराष्ट्रगीताने कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. जगन्नाथ नेरकर यांनी प्रास्ताविकातून सोहम् सार्वजनिक ग्रंथालयातील अभ्यासिकेतून आजतागायत पाचशेहून अधिक अधिकारी घडले आहेत. विद्यार्थ्यांमधील भावी अधिकाऱ्यांनी ओस पडून बंद होण्याच्या मार्गावरील मराठी शाळांना पुनरुज्जीवित करावे, असे आवाहन केले. विद्यार्थ्यांनी संयोजनात सहकार्य केले. प्रदीप गांधलीकर यांनी सूत्रसंचालन केले. नंदू कदम यांनी आभार मानले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.










