स्वरोपासनाच्यावतीने मराठी भाषा गौरवदिन साजरा


पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) -स्वरोपासना ग्लोबल म्युझिक अकॅडमी पुनावळे-वाकड शाखेतर्फे गुरुवार, दिनांक २७ फेब्रुवारी २०२५ रोजी मराठी भाषा गौरव दिवस साजरा करण्यात आला.


याप्रसंगी स्वरोपासना ग्लोबल म्युझिक अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेषभूषा परिधान करून मराठी भाषेची थोरवी वर्णन करणाऱ्या वैविध्यपूर्ण गेय कवितांचे सुरेल सादरीकरण केले. स्वरोपासनात ऑनलाईन पद्धतीने देखील संगीत शिकवले जाते. त्यामुळे अमेरिका, कॅनडा, जर्मनी, यूके, यूएइ, झिम्बाब्वे, प्राग येथील विद्यार्थीसुद्धा मराठी कविता सादरीकरणात सहभागी झाले होते. कुसुमाग्रज, वि. म. कुलकर्णी, सुरेश भट, अभयार्पिता या प्रथितयश ते नवोदित कवींच्या मराठीची महती वर्णन करणाऱ्या कवितांनी विद्यार्थी, पालक आणि संचालक यांना मंत्रमुग्ध करीत श्रवणानंदाची उत्कट अनुभूती दिली. यावेळी स्वरोपासना ग्लोबल म्युझिक अकॅडमीचे संचालक अभय कुलकर्णी,अर्पिता कुलकर्णी आणि अथर्व कुलकर्णी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना स्वरोपासना ‘गीत – फुलोरा कविता गायनाचा’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून गेल्या वीस वर्षांपासून भारतासह विदेशात मराठी कवितांचा परिमळ पोहोचविण्याचा प्रयत्न आम्ही करीत आहोत, अशी माहिती दिली.











