सावरकर क्रांतिकारकांचे मेरूमणी होते – राजेंद्र घावटे


निगडी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – “स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी शब्द, शस्र आणि वाणीने परकीय सत्तेला जबरदस्त हादरे दिले. भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील अनेक क्रांतीकारकांना त्यांच्या कार्यातून स्फुर्ती मिळाली. म्हणून सावरकर हे क्रांतिकारकांचे मेरूमणी ठरतात. सावरकर म्हणजे राष्ट्राचे सदैव चिंतन करणारा धगधगता अग्निकुंड ! घरादारावर तुळशीपत्र ठेवून त्यांनी केलेला त्याग अवर्णनीय असाच आहे.” असे प्रतिपादन जेष्ठ व्याख्याते राजेंद्र घावटे यांनी केले.


निगडी येथील स्वातंत्र्यवीर सावरकर उद्यानातील स्मारकात सावरकर मंडळाच्या वतीने आयोजित अभिवादन सभेत “स्वातंत्र्यसूर्य सावरकर” या विषयावर ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मंडळाचे अध्यक्ष विश्वनाथन नायर व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जेष्ठ अधिकारी विनायक थोरात उपस्थित होते.
घावटे पुढे म्हणाले की, “सावरकरांवर केवळ राजकीय हेतूने शिंतोडे उडवले जातात. त्यांच्याबद्दल विपरीत बोलणाऱ्या लोकांनी त्यांनी सोसलेल्या हाल अपेष्टा आठवाव्यात. सावरकर जाज्वल्य देशाभिमानी, प्रखर राष्ट्रभक्त, लेखक, भाषाप्रभू, अमोघ वक्ते, समाजसुधारक आणि विज्ञानवादी होते. धर्माची चिकित्सा करणारे हिंदू संघटक म्हणून त्यांची भूमिका महत्त्वाची आहे. एकाच वेळी दोन जन्मठेपेची शिक्षा झालेले जगाच्या पाठीवरील ते एकमेव क्रांतिकारक होते. सावरकरांनी लिहिलेल्या ‘अठराशे सत्तावन्न चे स्वातंत्र्यसमर’ या पुस्तकावर प्रकाशनापूर्वीच बंदी आलेली होती. अंधश्रद्धा निर्मूलन, कर्मकांड विरोध ,जातिभेद निर्मूलन , राजकारण, समाजकारण, साहित्य , धर्मचिकित्सा अशा अनेक आघाड्यावर काम करणारे सावरकर हे काळाच्या पुढचा विचार करणारे द्रष्टे सुधारक होते. ”
असे सांगत घावटे यांनी सावरकर यांच्या जीवनातील अनेक प्रसंग आपल्या ओघवत्या शैलीत कथन केले.

यावेळी माजी नगरसेविका शर्मिला बाबर, डॉ. गीता आफळे, अमित गावडे, विजय शिनकर, पांडुरंग फाटक, गीता खंडकर, डॉ. गिरीश आफळे, ज्ञानेश्वर सावंत, भगवान पठारे यांच्यासह अनेक मान्यवर व सावरकरप्रेमी उपस्थित होते.
भास्कर रिकामे यांनी सुत्रसंचालन केले, विश्वास करंदीकर यांनी प्रास्ताविक केले तर विश्वनाथन नायर यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी राजेंद्र बाबर यांनी विशेष परिश्रम घेतले.










