पिंपरी- चिंचवड महानगरपालिकेच्या महत्त्वाच्या सेवांचा लाभ घेता येणार घरबसल्या!


पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी- चिंचवड महानगरपालिकेच्या मालमत्ता हस्तांतरण, विवाह नोंदणी प्रमाणपत्र, अग्निशमन विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र यासह विविध सेवांचा लाभ आता शहरातील नागरिकांना घरबसल्या घेता येणार आहे. यासाठी पिंपरी- चिंचवड महानगरपालिका, डिजीलॉकर, नोंदणी आणि मुद्रांक विभाग महाराष्ट्र राज्य, व आपले सरकार पोर्टल यांच्यातील आवश्यक असणारे डेटा शेअरिंग इंटिग्रेशन पूर्ण झाले आहे. यानिमित्ताने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने कागदविरहित आणि नागरिकांभिमूख प्रशासनाच्या दिशेने एक मोठे पाऊल उचलले आहे.


पिंपरी- चिंचवड महानगरपालिका आणि नोंदणी आणि मुद्रांक विभाग महाराष्ट्र राज्य यांच्यातील डेटा शेअरिंग इंटिग्रेशन पूर्ण झाल्यामुळे पिंपरी- चिंचवड शहरातील मालमत्ता हस्तांतरण ऑनलाइन पद्धतीने शक्य झाले आहे. मालमत्ता खरेदीदारांना आता मालमत्ता हस्तांतरणासाठी महानगरपालिकेत स्वतंत्रपणे अर्ज करण्याची आवश्यकता नाही. तसेच नाव हस्तांतरणाची प्रक्रिया जलद झाली असून ती एका दिवसात पूर्ण होणार आहे. याशिवाय मालमत्तेच्या वापरातील निवासी ते व्यावसायिक अशा स्वरुपाचा कोणताही बदल महानगरपालिकेच्या रेकॉर्डमध्ये स्वयंचलितपणे अपडेट करणे शक्य होणार आहे.

पिंपरी- चिंचवड महानगरपालिकेच्या महत्त्वाच्या काही सेवा प्रायोगिक तत्त्वावर महाराष्ट्र सरकारच्या आपले सरकार पोर्टलवर देखील उपलब्ध करून दिल्या आहेत. यामुळे नागरिकांना महानगरपालिका कार्यालयांना भेट न देत आवश्यक सेवांचा लाभ घेता येणार आहे. यामध्ये प्रामुख्याने उद्योगधंदा परवाना, जलनिसरण जोडणी, अग्निशमन विभागाची एनओसी अशा सेवांचा समावेश आहे.
पिंपरी- चिंचवड महानगरपालिकेच्या विवाह नोंदणी प्रणाली डिजीलॉकरसोबत यशस्वीरित्या जोडण्यात आली आहे. त्यामुळे रहिवाशांना त्यांचे विवाह प्रमाणपत्रे ऑनलाइन उपलब्ध होणार आहे. पहिल्या टप्प्यात २०१४ पासून जारी करण्यात आलेले प्रमाणपत्रे आता डिजीटल पद्धतीने उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
“पिंपरी- चिंचवड महानगरपालिकेचे डिजीलॉकर, नोंदणी आणि मुद्रांक विभाग महाराष्ट्र राज्य, व आपले सरकार पोर्टल यांच्यातील आवश्यक असणारे डेटा शेअरिंग इंटिग्रेशन पूर्ण झाल्यामुळे आता नागरिकांना महानगरपालिकेच्या महत्त्वाच्या सेवा अधिक सुलभपणे देणे शक्य होणार आहे. नागरिकांना जलद आणि अधिक कार्यक्षम प्रशासनाचा अनुभव देता यावा, यासाठी महानगरपालिकेने टाकलेले हा महत्त्वाचे पाऊल आहे.”
–शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक, पिंपरी- चिंचवड महानगरपालिका










