स्वच्छतागृहांची संख्या वाढवणे, अतिक्रमण हटवणे, अनधिकृत पत्राशेड बांधकामावर कारवाई करणे आदी सूचना नागरिकांनी जनसंवाद सभेत मांडल्या


पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महापालिकेच्या वतीने घेण्यात येणाऱ्या जनसंवाद सभेत आज ९८ तक्रार वजा सूचना नागरिकांनी मांडल्या.


शहरातील नागरीक आणि प्रशासन यांच्यात सुसंवाद राखण्यासाठी तसेच तक्रारींचे निवारण जलद गतीने करण्यासाठी जनसंवाद सभेचे आयोजन महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या सोमवारी सर्व क्षेत्रीय कार्यालयात समन्वय अधिकारी यांच्या नियंत्रणाखाली करण्यात येते. या जनसंवाद सभेचे अध्यक्षस्थान नेमण्यात आलेल्या समन्वय अधिकाऱ्यांनी भूषवले.

आज झालेल्या जनसंवाद सभेत नागरीकांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून तक्रारी वजा सूचना मांडल्या. यामध्ये अ, ब, क, ड, इ, फ, ग आणि ह या क्षेत्रीय कार्यालयात अनुक्रमे ८,१४,४, २६, ८,८,१३ आणि १७ याप्रमाणे एकुण ९८ तक्रारी वजा सुचना नागरिकांनी मांडल्या.
आज झालेल्या जनसंवाद सभेत फुटलेली ड्रेनेज लाईन दुरुस्त करणे, नवीन ड्रेनेज लाईन टाकणे, नवीन डीपी उभारणे, अनधिकृत आरओ प्लांट बंद करणे, रस्त्यावरील खड्डे बुजवणे, रस्त्याचे डांबरीकरण करणे, विविध ठिकाणी साचलेला कचरा वेळोवेळी उचलणे, कचरावेचक गाड्या वेळेवर पाठवणे, राडारोडा उचलणे, स्वच्छतागृहांची संख्या वाढवणे, अतिक्रमण हटवणे, अनधिकृत पत्राशेड बांधकामावर कारवाई करणे या तक्रारी वजा सूचना नागरिकांनी उपस्थित राहून मांडल्या.
जनसंवाद सभेत येणाऱ्या नागरिक व तक्रारींची संख्या अधिक असल्यामुळे सभेच्या कामकाजात सुसूत्रता आणण्यासाठी कामकाजाचे विनियमन करण्यासाठी परिपत्रक निर्गमित करण्यात आले होते. या परिपत्रकाद्वारे सर्व नागरिकांची आसन व्यवस्था प्रतिक्षा कक्षात करावी, नागरिकांच्या तक्रारी नमूद करण्यासाठी अर्जाचा नमुना भरून घ्यावा, प्रत्येक व्यक्तीसाठी वेळ मर्यादा निश्चित करण्यात आली असून नागरिकाची तक्रार समजावून घेतल्यानंतरच दुसरी तक्रार घेण्यात यावी, अधिकारी कर्मचारी यांनी जनसंवाद सभेत सुनिश्चित वेळेवर उपस्थित राहण्याची दक्षता घ्यावी, तक्रारदार यांचे नाव गोपनीय राहील याची दक्षता घ्यावी, नागरिकांना जनसंवाद सभेचे व्हिडीओ चित्रीकरण करता येणार नाही, जनसंवाद सभेतील अहवाल आणि माहिती पत्रकारांना जनसंवाद सभा संपल्यानंतर देण्यात यावी, जनसंवाद सभा झाल्यानंतर नागरिकांचा अभिप्राय नोंदवून घेऊन भविष्यातील सुधारणांबाबत आढावा घ्यावा असे आदेश निर्गमित करण्यात आले होते. त्याप्रमाणे कार्यवाही चालु करण्यात आली आहे.










