पिंपरी चिंचवड महापालिकेचा ९ हजार ६७५ कोटी अर्थसंकल्प सादर
प्रशासकीय राजवटीतील हा सलग तिसरा अर्थसंकल्प


पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या यंदाच्या अर्थसंकल्पात मिळकत, पाणीपट्टीमध्ये कोणतीही करवाढ करण्यात आलेली नाही. सन २०२५ – २६ या आर्थिक वर्षाचा ६ हजार २५६ कोटी रुपयांचा मूळ तर, केंद्र सरकार पुरस्कृत योजनांसह ९ हजार ६७५ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प आज (दि. 21) आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी सादर केला. प्रशासकीय राजवटीतील हा सलग तिसरा अर्थसंकल्प आहे.



आर्थिक स्थिरता, स्मार्ट प्रशासन, प्रगत शिक्षण, हरित सेतू, सिटी सेंटर, क्लायमेट बजेट, नागरी सूचनांचा सहभाग घेऊन विकास, पायभूत सुविधा सक्षमीकरण भर, सामाजिक समता, शाश्वत हवामानास अनुकूल विकास असे अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्ये असणार आहेत.

आरोग्य, वैद्यकीय, शिक्षण, पर्यावरण अशा पायाभूत सक्षमीकरणावर भर दिला आहे. ८३२ कोटी २७ लाख रुपये शिलकीच्या अर्थसंकल्पात मालमत्ता कर आणि बांधकाम परवानगीतून मिळणाऱ्या उत्पन्न वाढीवर भिस्त आहे.अडीच लाख नवीन मिळकत शोधल्या आहेत. त्यामुळे उत्पन्न वाढणार आहे. टेल्को रोडसाठी ७१ कोटी तरतूद केली आहे. शहरात नवीन ३४ डीपी रोड विकसित होणार आहे. मिसिंग लिंक ३६ रस्ते करणार त्यातून वाहतूक कोंडी कमी होणार आहे.
दरम्यान, सभेचे कामकाज नगरसचिव मुकेश कोळप यांनी सुरु केले. प्रारंभी मुख्य वित्त व लेखाधिकारी प्रवीण जैन यांनी आयुक्त आणि प्रशासक शेखर सिंह यांच्याकडे अर्थसंकल्प सुपूर्द केला. यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे, विजयकुमार खोराटे, शहर अभियंता मकरंद निकम, मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे, संजय कुलकर्णी आदी उपस्थित होते. प्रशासक सिंह यांनी अर्थसंकल्पास मान्यता दिली. त्यामुळे १ एप्रिल २०२५ पासून अर्थसंकल्पाची अंमलबजावणी सुरु होणार आहे.
अर्थसंकल्पाची वैशिष्ट्ये
१) विविध विकास कामांसाठी ११५० कोटी
२) क्षेत्रीय स्तरावरील विकास कामांसाठी ११६२ कोटी ७२ लाख
३) पाणीपुरवठा विशेष निधी ३०० कोटी
४) दिव्यांग कल्याणकारी योजना ६२ कोटी
५) भूसंपादन तरतूद १०० कोटी
६) अतिक्रमण निर्मूलन १०० कोटी
७) शहरी गरीब योजना १८९८ कोटी
८) स्मार्ट सिटीसाठी ५० कोटी
९) अमृत योजना ५५ कोटी ४८ लाख
१०) पीएमपीचसाठी तरतूद ४१७ कोटी








