ताज्या घडामोडीपिंपरी

सावधान! पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नावाने पाणी पुरवठा बंद करण्याबाबत येते आहेत बनावट ‘एसएमएस’

नागरिकांना काळजी घेण्याचे महानगरपालिकेचे आवाहन

Spread the love

पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) पिंपरी चिंचवड महानगरपालिका पाणी पुरवठा विभाग यांच्या नावाने पाणी पुरवठा बंद करण्यात येत असल्याचे बनावट एसएमएस पाठवण्याचे प्रकार शहरामध्ये घडत आहेत. नागरिकांनी अशा बनावट एसएमएसकडे दुर्लक्ष करावे. तसेच बनावट एसएमएस पाठवणाऱ्या क्रमांकाची तक्रार सायबर पोलिसांकडे करावी, असे आवाहन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रात सध्या ज्या मालमत्तेची पाणीपट्टी थकीत आहे, अशा मालमत्तेचे नळकनेक्शन तोडण्याची कारवाई सुरू आहे. याशिवाय थकीत पाणीपट्टी भरण्याचे आवाहन महानगरपालिकेच्या माध्यमातून ‘एसएमएस’ द्वारे व इतर माध्यमातून करण्यात येत असते. परंतु सध्या महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाच्या नावाने विविध मोबाईल क्रमांकावरून बनावट एसएमएस पाठवण्याचे प्रकार सुरू आहेत. अशा एसएमएसकडे दुर्लक्ष करण्याचे आवाहन महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाच्या नावाने प्राप्त होणाऱ्या बनावट एसएमएस बाबत तक्रार करण्यासाठी नागरिक तात्काळ जवळचे पोलीस ठाणे किंवा सायबर पोलीस ठाणे येथे किंवा टोल फ्री क्रमांक १९०३ यावर संपर्क करू शकतात.

चौकट

असा आहे बनावट एसएमएस

पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांना पाठवण्यात येणारे बनावट एसएमएस देवेश जोशी या नावाने आहेत. या एसएमएसमध्ये नमुद करण्यात आले आहे की, ‘प्रिय ग्राहक मागील महिन्यातील बिल न भरल्यामुळे रात्री ९ वाजता पाणी पुरवठा बंद करण्यात येणार आहे. कृपया याबाबत तात्काळ खालील नंबरवर कॉल करा.’ याशिवाय, व्हॉट्सअपद्वारे पाठवण्यात येणाऱ्या एसएमएसमध्ये एक एपीके (APK) फाईल पाठवली जात आहे. ही एपीके फाईल डाऊनलोड केल्यानंतर मोबाईल फोनमधील डेटा, बँक खात्याची माहिती, पासवर्ड अशा स्वरुपाच्या माहिती मिळवून बँक खात्यातून पैसे काढून नागरिकांची फसवणूक केल्याचे प्रकार घडत आहेत. तरी अशा आशयाचा कोणताही एसएमएस महानगरपालिकेकडून पाठवण्यात येत नसल्याने नागरिकांनी घाबरून न जाता तात्काळ असा एसएमएस येताच तक्रार करावी, असे आवाहन करण्यात येत आहे.

कोट

पिंपरी चिंचवड महानगपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाच्या नावाने बनावट ‘एसएमएस’ वारंवार विविध क्रमांकावरुन नागरिकांना पाठवण्यात येत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. नागरिकांनी फसवणूक करणाऱ्या एसएमएसकडे दुर्लक्ष करुन त्यामध्ये नमुद करण्यात आलेल्या क्रमांकावर संपर्क करू नये. तसेच बनावट एसएमएसद्वारे पाठविण्यात येणारे एपीके डाऊनलोड करू नये. बनावट एसएमएस पाठवणाऱ्यांबाबत महानगरपालिकेकडून सायबर पोलिसांना माहिती देण्यात येणार आहे. नागरिकांनी देखील त्यांना बनावट एसएमएस प्राप्त झाल्यास त्याबाबत सायबर पोलिसांकडे तक्रार करावी.

-शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक, पिंपरी चिंचवड महानगरपालिका

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button