बंजारा समाज भवनासाठी ५१ लाखाच्या निधीची आमदार सुनील शेळके यांची घोषणा
तळेगावमध्ये संत सेवालाल जयंती उत्साहात साजरी


तळेगाव दाभाडे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मावळ तालुक्यात बंजारा समाज भवन बांधण्यासाठी आपण प्रयत्नशील असून, बंजारा बांधवानी मावळ तालुक्यात जागा उपलब्ध करून द्यावी. आपण समाज भवन बांधण्यासाठी ५१ लाख रुपयांचा निधी देऊ, असे आश्वासन मावळचे आमदार सुनील शेळके यांनी दिले.



बंजारा सेवा संघ, मावळच्या वतीने संत गुरु सेवालाल महाराजांच्या जयंतीनिमित्त तळेगाव दाभाडे येथील सुशीला मंगल कार्यालयात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. तत्पूर्वी, जिजामाता चौक, मारुती मंदिर चौक ते सुशीला मंगल कार्यालया दरम्यान भव्य रथयात्रा काढण्यात आली. या रथयात्रेत मावळ तालुक्यातील बंजारा समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाला होता. त्यानंतर संत सेवालाल महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व भोग करण्यात आला. या मेळाव्याचे उदघाट्न उद्योजक संतोष पवार यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार सुनील शेळके होते.

यावेळी खासदार श्रीरंग बारणे, माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, श्रीमंत सत्येंद्रराजे दाभाडे, याज्ञसेनीराजे दाभाडे, तळेगाव नगरपरिषदेच्या उपमुख्याधिकारी ममता चव्हाण – राठोड, तळेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक घोगरे, युवानेते रवींद्र भेगडे, बंजारा सेवा संघ मावळचे संस्थापक अध्यक्ष हिरा रतनू जाधव, अध्यक्ष महादेव राठोड, उपाध्यक्ष चंदू राठोड, देसू राठोड, सचिव अमरजीत चव्हाण, खजिनदार राजू पवार, अभिनेते आशुतोष राठोड, मार्ग फाऊंडेशन सोलापूरचे अध्यक्ष संतोष पवार, शंकर पवार, जयराम चव्हाण, विजापूरचे माजी स्थायी समिती अध्यक्ष रामभाऊ राठोड, देवेंद्र राठोड, विठ्ठल राठोड, शेट्टीप्रताप चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.
आमदार शेळके म्हणाले, की बंजारा समाज हा मेहनत करून जीवन जगणारा समाज आहे. आज शिक्षण घेऊन हा समाज मुख्य प्रवाहात आला आहे. अनेकजण उच्चशिक्षित असून, मोठ्या अधिकारीपदावर कार्यरत आहेत. या समाजाला हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत.
ममता राठोड यांनी बंजारा समाजाचे योगदान लक्षात घेऊन या समाजाला हक्काचे व्यासपीठ समाजभवन मिळावे,अशी मागणी समाजाच्या वतीने केली.
खासदार श्रीरंग बारणे, सत्येंद्रराजे दाभाडे, रवींद्र भेगडे, संतोष पवार यांनीही विचार व्यक्त केले.
प्रास्ताविक हिरा जाधव यांनी केले. सूत्रसंचालन नितीन पांडे यांनी केले, तर लखन जाधव यांनी आभार मानले.








