पीएमआरडीएतील 10 सेवा नागरिकांसाठी ऑनलाईन


महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम अंतर्गत सेवांसाठी घेता येणार लाभ



पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – नागरिकांना सुलभ व कालमर्यादेत सेवा मिळाव्यात, यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातील महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमानुसार १० सेवा १ फेब्रुवारीपासून प्रारंभ करण्यात आल्या आहे. यामुळे नागरिकांना दिलासा मिळणार आहे. नागरिकांची शासकीय कामे घरबसल्या ऑनलाईन व्हावी, यासाठी पीएमआरडीएच्या माध्यमातून सेवा सुविधा ऑनलाईन करण्यात येत आहे.

शासनाच्या अधिसूचित सेवा पारदर्शक, गतिमान आणि विहित कालमर्यादेत देण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम अंमलात आला आहे. या अंतर्गत नागरिकांना घरबसल्या ऑनलाईन शासकीय सेवा देण्याच्या दृष्टीने शासनाचे निर्देश आहे. त्या अनुषंगाने पीएमआरडीएच्या माध्यमातून १० सेवा नागरिकांना दि १ फेब्रुवारी २०२५ पासून ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात आल्या आहे. संबंधित सेवांचा लाभ नागरिकांना घ्यावा, असे आवाहन पीएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी केले आहे.
*मॅसेजद्वारे कळणार माहिती*
या ऑनलाईन प्रणालीत अर्जदार नागरिकांना त्यांनी अर्जात नमूद केलेल्या मोबाईल क्रमांकावर अर्ज प्राप्त झाल्याचा संदेश मिळेल. यामुळे नागरिकांना कार्यालयात येण्याची गरज राहणार नाही. संबंधितांना आपली फाईल कुठल्या टेबलवर पुढील कार्यवाहीसाठी आहे, याची माहिती अर्जसोबत नमूद केलेल्या क्रमांकावर या ऑनलाईन प्रणालीच्या माध्यमातून कळणार आहे.
*या सेवा ऑनलाईन उपलब्ध*
नागरिकांना दिलासा देण्याच्या दृष्टिकोनातून पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या १० सेवा ऑनलाईन उपलब्ध करून दिल्या असून त्या खालीलप्रमाणे आहेत.
*विकास परवानगी विभाग*
१) अभिन्यास / इमारत बांधकाम परवानगी
२) जोता मोजणी प्रमाणपत्र
३) भोगवटा प्रमाणपत्र
४) झोन दाखला
५) भाग नकाशा
*जमीन व मालमत्ता विभाग*
६) वाटप भूखंडाचे / गृहयोजनेतील सदनिकांचे हस्तांतरण करणे
७) वाटप भूखंडावर / गृह योजनेतील सदनिकांवर वारस नोंद करणे
८) वाटप भूखंडावर / गृहयोजना सदनिकांवर कर्जासाठी ना हरकत प्रमाणपत्र देणे
*अग्निशमन विभाग*
९) प्राथमिक अग्निशमन ना हरकत दाखला
१०) अंतिम अग्निशमन ना हरकत दाखला
सदर सेवा पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या https://www.pmrda.gov.in या संकेत स्थळावर नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहे. या १० सेवांसाठी १ फेब्रुवारी २०२५ पासून नागरिकांनी ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे. ऑनलाईन अर्ज करण्यास अडचणी आल्यास संबंधित विभागाला भेट दयावी. त्याठिकाणी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याकरिता नागरिकांना सर्वतोपरी सहकार्य करण्यात येणार आहे.








