महात्मा गांधी स्मृती दिनानिमित्त काँग्रेसची श्रद्धांजली सभा पिंपरीत संपन्न
जय बापू, जय भीम, जय संविधानचा काँग्रेसी नारा


पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 77 व्या स्मृतिदिनानिमित्त आज मोरवाडी पिंपरी येथे श्रद्धांजली सभेचे आयोजन पिंपरी चिंचवड काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केले.



याप्रसंगी सध्या देशभर काँग्रेस कडून संविधान रक्षणासाठी आणि संविधानाबाबत जनजागरणासाठी सुरू केलेला जय बापू, जय भीम, जय संविधान या अभियानांतर्गत संविधान प्रस्ताविकेचे सामूहिक वाचन आणि अहिंसेची शपथ सामूहिक स्वरूपात घेण्यात आली.
याप्रसंगी सर्व पदाधिकाऱ्यांनी संविधानाबाबतीमध्ये अधिक प्रमाणामध्ये जनजागरण करीत उपक्रम आगामी काळात शहरभर राबवणार असल्याचा संकल्प केला.
पत्रके वाटप, जनसभा, समूह सभा, युवा संवाद, गृहिणी संवाद, विविध स्पर्धा तसेच दृकश्राव्य माध्यमातून प्रचार करत अशा व इतरही विविध पद्धतीच्या उपक्रमाद्वारे संविधानाचे जनसामान्यांना असणारे महत्त्व पटवून देण्याचा निर्धार काँग्रेस कार्यकर्त्यांनी आज महात्मा गांधींच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित केलेल्या श्रद्धांजली सभेत केला.

यावेळी उपस्थितानी मनोगते व्यक्त करत, महात्मा गांधी यांच्या जीवन प्रसंगांची आठवण करून देत, त्यांच्या योगदानाचे स्मरण करत राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना श्रद्धांजली अर्पण केली.
याप्रसंगी बोलताना नरेंद्र बनसोडे म्हणाले, “बापूंनी दिलेल्या शिकवणी आजही सर्व क्षेत्रात प्रगतीपथावर नेण्याचा मूलमंत्र सिद्ध होत आहेत, संपूर्ण जगामध्ये भारताची ओळख ही भगवान बुद्ध आणि महात्मा गांधी यांच्यापासून सुरुवात होते, महात्मा गांधींनी केवळ स्वातंत्र्यलढाच यशस्वी केला नाही तर या जगामध्ये फार मोठा इतिहास घडवणारी एक निशस्त्र क्रांती आणि मानवी जीवनमूल्य सर्वसामान्यांना देऊन मानवतावादाचा, समतेचा, सत्य अहिंसेचा
फार मोठा इतिहास रचला आहे. भारताची एकंदरीत जीवन पद्धती ही भारतीय संविधानाच्या मूल्यांवर स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, सामाजिक न्याय यावर आधारित आहे आणि आज भारतीय संविधानाची मोडतोड करण्याचा प्रयत्न सत्ताधारी करत आहेत म्हणूनच काँग्रेस पक्षाने जय बापू जय, भीम जय, संविधान अभियान सुरू करून संविधानाची महती जन माणसात अधिक प्रमाणात प्रचार प्रसार करण्यासाठी सुरू केली आहे आणि हेच कार्य आजच्या काळात करणे खऱ्या अर्थाने बापू ना श्रद्धांजली ठरेल.”
याप्रसंगी काँग्रेसच्या ज्येष्ठ महिला नेत्या निगार बारस्कर, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस गौतम आरकडे, शहर काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष नरेंद्र बनसोडे, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष कौस्तुभ नवले, महिला काँग्रेसच्या शहराध्यक्ष सायली नढे, एन एस यु आय चे प्रदेश उपाध्यक्ष ॲड.उमेश खंदारे, ओबीसी विभागाचे प्रदेश सरचिटणीस किशोर कळसकर, सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष चंद्रकांत लोंढे, महिला नेत्या स्वाती शिंदे, किरण नढे,आबासाहेब खराडे, जितेंद्र छाबडा, भास्कर नारखेडे, बाळासाहेब पाटील, श्रीरंग सरपाते, संतोष चोरगे आदी उपस्थित होते.








