‘आचार्य बाळशास्त्री जांभेकर ज्येष्ठ पत्रकार सन्मान योजनेतील पेन्शन, नियम व अटी शिथिल करा’, उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे निर्देश
पत्रकारांचे कायदेशीर प्रश्न व समस्या मार्गी लावण्यासाठी कायदा सेवा कक्ष स्थापन करावा- डॉ. नीलम गोऱ्हे


मुंबई, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – आज (२८ जानेवारी २०२५) आचार्य बाळशास्त्री जांभेकर ज्येष्ठ पत्रकार सन्मान योजनेतील पेन्शन, नियम व अटी शिथिल करून ज्येष्ठ पत्रकार/ छायाचित्रकार यांना योजनेचा लाभ मिळण्याबाबत विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या मार्गदर्शनात बैठक झाली. जेष्ठ अधीस्वीकृती पत्रकार कार्ड व आयकर भरावा लागत नाही या दोन कागदपत्रकारांच्या आधारे पेन्शन प्रकरणे मंजूरीचा निर्णय मंत्रालयीन अधिस्वीकृती समितीने घ्यावे असे निर्देश उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिल्या.



राज्य सरकारने सुरू केलेल्या आचार्य बाळशास्त्री जांभेकर ज्येष्ठ पत्रकार सन्मान योजनेंतर्गत १८६ पत्रकारांना पेन्शन योजना सुरू आहे. या योजनेकरिता ५० कोटींची तरतुद करण्यात आली असून दरम्यान, जेष्ठ अधिस्वीकृती पत्रकारांना पेन्शन योजनेचा लाभ मिळण्याकरिता अनेक अटी, शर्तीतून जावे लागत आहे. याबाबत कोल्हापूर प्रेस क्लबच्या निवेदनातून विविध मुद्दे या बैठकीत मांडण्यात आले. पत्रकारांना विशिष्ट आजारांसाठी शासनाच्या योजनांमधून वैद्यकीय मदत मिळत असली तरीही नियमित आजारांसाठी वैद्यकीय मदत प्राप्त व्हावी याकरिता CSR फंडातून निधी प्राप्त करण्याचा प्रयत्न करा, पत्रकारांसाठी कायदा सहाय्य कक्ष तयार करा, जेष्ठ सेवा प्राधिकरणांतर्गत पत्रकारांच्या समस्या दूर करा, असे निर्देशही डॉ. नीलम गोऱ्हे यांनी माहिती संचनालय विभागाला दिल्या.

जेष्ठ अधिस्वीकृती पत्रकार सन्मान योजनेतील सदस्यांची भविष्यातील वाढती संख्या लक्षात घेता, अधिक निधीचा प्रस्ताव वित्त विभागाला सादर करावा असेही सांगण्यात आले. त्याचबरोबर, पेन्शन योजना लागू होण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता तसेच, कार्यालयीन कर्मचारी असल्याच्या नोंदी ठेवण्याबाबत सर्व संपादकांना पत्र पाठवणार असल्याचे डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या.
काही पत्रकार ज्या प्रसारमाध्यमात काम करत होते, त्यापैकी काही दैनिक सध्या अस्तित्वात नसल्याने आवश्यक कागदपत्रांची पूर्तता होऊ शकत नाही, तसेच इतरही अडचणी लक्षात घेता, एक समिती गठित करावी असे निर्देशही डॉ. गोऱ्हे यांनी दिले.
या बैठकीला माहिती संचनालय विभागाचे संचालक दयानंद कांबळे, मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहार संघाचे अध्यक्ष प्रमोद डोईफोडे, सरचिटणीस प्रवीण पुरो, माजी अध्यक्ष मंदार पारकर, कोल्हापूर प्रेस क्लब अध्यक्ष शीतल धनवडे, उपाध्यक्ष प्रशांत आयरेकर, संचालक समीर मुजावर, दिपक जाधव, मीडिया असोसिएशन ऑफ इंडियाच्या संस्थापक अध्यक्ष शीतल करदेकर, कोशाध्यक्ष चेतन काशीकर मीडिया असोशिएशन ऑफ इंडिया ,कोल्हापुर संस्थापक शेखर धोंगडे उपस्थित होते.








