नृत्यगीतांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी घडविले संस्कृतीचे दर्शन


पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – बालवाडी ते इयत्ता सातवीतील विद्यार्थ्यांनी वैविध्यपूर्ण नृत्यगीतांच्या प्रभावी सादरीकरणातून महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरील समृद्ध संस्कृतीचे नयनरम्य दर्शन घडवून उपस्थितांची मने जिंकली. यासाठी पी. सी. एम. सी. पब्लिक स्कूल अर्थात वैष्णोमाता प्राथमिक विद्यामंदिर, इंद्रायणीनगर, भोसरी या शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे निमित्त होते. अंकुशराव लांडगे सभागृह, भोसरी येथे गुरुवार, दिनांक २३ जानेवारी २०२५ रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झालेल्या या समारंभात पिंपरी – चिंचवड महापालिका शिक्षण विभाग प्रशासन अधिकारी संगीता बांगर, स्थायी समितीचे माजी सभापती विलास मडिगेरी, माजी नगरसेविका नम्रता लोंढे, यशोदा बोईनवाड, राजेंद्र लांडगे, माजी आरोग्य अधिकारी प्रभाकर तावरे, आकांक्षा फाउंडेशनचे आकाश गोरे, सामाजिक कार्यकर्ते योगेश लोंढे, आनंद चव्हाण, मुख्याध्यापिका वंदना इन्नाणी, माजी मुख्याध्यापिका शैला मातेरे, पर्यवेक्षिका प्रमिला जाधव, अरुणा महानवर, सुरेखा मोरे, निर्मला लोखंडे आदी मान्यवरांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती; तर विद्यार्थी, पालक, शिक्षकवृंद यांची मोठ्या संख्येने सभागृहात उपस्थिती होती.



दीप प्रज्वलन आणि सरस्वतीपूजनाने समारंभाचा प्रारंभ करण्यात आला. विलास मडिगेरी यांनी मनोगतातून, ‘फक्त पस्तीस विद्यार्थ्यांसह सुरुवात झालेल्या वैष्णोमाता प्राथमिक विद्यामंदिर या शाळेचा आता विशाल वटवृक्ष झाला आहे. जल्लोष शिक्षणाचा अभियानांतर्गत दीड कोटी रुपयांचे प्रथम पारितोषिक प्राप्त करणारी पिंपरी – चिंचवड महापालिकेची शाळा; तसेच ड्रॅनेज ॲलर्ट सिस्टीम प्रकल्पात आंतरराष्ट्रीय स्तरावर सुमारे शेहेचाळीस देशांमधून पुरस्कार प्राप्त करणारी शाळा असा लौकिक असलेल्या या शाळेचा आम्हाला खूप अभिमान वाटतो!’ असे गौरवोद्गार काढले. अरुणा महानवर यांनी, ‘कनिष्ठ स्तरावरील सर्वसामान्य
कुटुंबातल्या मुलांना अशा व्यासपीठावर संधी मिळाल्याने यांच्यातून उद्याचे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे कलाकार निर्माण होतील!’ अशा शब्दांत शुभेच्छा व्यक्त केल्या.

“आमच्या पप्पांनी गणपती आणला…” या लोकप्रिय नृत्यगीताच्या सुंदर सादरीकरणातून बालवाडीच्या चिमुरड्यांनी समारंभाची धडाकेबाज सुरुवात केली. ईश्वरभक्ती, देशभक्ती, निसर्गवर्णन, सण – समारंभ, रूढी – परंपरा अन् समृद्ध संस्कृतीचा मागोवा घेणारी लोकनृत्ये, त्याला भक्तिगीते, लोकगीते, भावगीते आणि लोकप्रिय चित्रपटगीतांचे पार्श्वसंगीत; तसेच अनुरूप वेषभूषा यामुळे उत्तरोत्तर नृत्यगीतांची रंगत वाढत गेली. सहभागी मुलामुलींचा उत्साह ओसंडून वाहत होताच; पण आरोही शिंदे ही दिव्यांग विद्यार्थिनी आत्मविश्वासाने नृत्यात सहभागी झाल्याबद्दल तिचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच सहभागी विद्यार्थ्यांचे नृत्यकौशल्य पाहून खूश झालेल्या पालकांनी रोख बक्षिसांची खैरात करीत त्यांचे कौतुक केले.
कार्यक्रमादरम्यान मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांच्या हस्तलिखित स्मरणिका आणि दैनंदिनीचे प्रकाशन करण्यात आले. विविध स्पर्धांमधील विजेत्या विद्यार्थ्यांना भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले; तसेच विद्यार्थ्यांवर संस्कार करणार्या आणि त्यांच्या सुप्त कलागुणांना विकसित करणार्या शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षकवृंद आणि शिक्षकेतर कर्मचारीवर्ग यांनी संयोजनात परिश्रम घेतले. गणेश लिंगडे यांनी सूत्रसंचालन केले. वंदना इन्नाणी यांनी आभार मानले.








