सांगवी येथील पी.डब्लू. डी. मैदान येथे २१ ते २४ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत पवनाथडी जत्रेस येणाऱ्या खर्चास स्थायी समितीची मान्यता


पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पवनाथडी जत्रा २०२४-२५ उपक्रमाचे आयोजन करणे, सन २०२५-२६ या सरकारी वर्षाकरिता करांचे व करेत्तर बाबींचे दर निश्चिती करणे अशा विविध विषयांना प्रशासक शेखर सिंह यांनी आज झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता दिली.



स्थायी समिती आणि महापालिका सभेची मान्यता आवश्यक असलेले विषय प्रशासक शेखर सिंह यांच्या मान्यतेसाठी आज झालेल्या बैठकीत ठेवण्यात आले होते. पिंपरी येथील महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत पार पडलेल्या या बैठकीस अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, चंद्रकांत इंदलकर यांच्यासह सर्व विभागांचे प्रमुख तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.

समाजविकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या महिला व बालकल्याण योजनेअंतर्गत महापालिका हद्दीतील महिला बचत गट आणि बचत गटातील महिलांनी तयार केलेल्या वस्तू उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी, महिलांना मार्केटिंग कौशल्ये ज्ञात व्हावीत, महिला उद्योजिका तयार व्हाव्यात या हेतूने दरवर्षी पवनाथडी जत्रा या उपक्रमाचे आयोजन केले जाते. यावर्षी देखील सांगवी येथील पी.डब्लू. डी. मैदान येथे २१ ते २४ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत पवनाथडी जत्रेचे आयोजन करण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने येणाऱ्या खर्चास प्रशासक शेखर सिंह यांनी आज झालेल्या बैठकीत मान्यता दिली.
महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागामार्फत महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलम १२७ व १२९ मधील तरतुदीनुसार शहरातील इमारत तसेच जमिनीवर मालमत्ता कर आकारणीची तरतूद आहे. आकारणी रजिस्टरला नोंद असलेल्या मालमत्तांवर कलम ९९ मधील तरतूदीनुसार महापालिका सभेने मंजूर केलेल्या दराने मालमत्ता कराची आकारणी केली जाते. तसेच शासनाचे शिक्षणकर, रोजगार हमी कर व फ्लोअरेज कराची वसुली राज्य शासनाने ठरवून दिलेल्या दराने महाराष्ट्र शासनाकरिता केली जाते. त्यानुसार सन २०२५-२६ करिता कर व करेत्तर बाबींचे प्रस्तावित दर प्रशासक यांच्या मान्यतेसाठी स्थायी समिती सभेत सादर करण्यात आले. या दरांना प्रशासक शेखर सिंह यांनी आज मान्यता दिली.
याशिवाय महापालिका कार्यक्षेत्रात पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये मोठ्या जनावरांकरिता नवीन इन्सीनरेटर बसविणे, महापालिकेच्या इंद्रायणीनगर येथील स्व. अटलबिहारी वाजपेयी उद्यान व डी.सी सर्कल येथे सुशोभिकरण करण्यासाठी रोपे पुरविणे व लागवड करणे, महापालिका हद्दीतील प्रभाग क्र.१ मधील शेलारवस्ती व औद्योगिक परिसरातील रस्त्यांचे मजबुतीकरण करून डांबरीकरण करणे, प्रभाग क्र. २५ येथील पुणे-बंगलोर हायवेच्या पुर्व व पश्चिमेकडील वाकड, ताथवडे, पुनावळे भागातील रस्ते डब्ल्यूएमएम व एमपीएम पद्धतीने विकसित करणे, महापालिकेच्या कावेरीनगर येथील इएसआर भरणेकरिता पंपिग मशिनरी बसविणे, आवश्यकतेनुसार विविध ठिकाणी जलनि:सारण व्यवस्थेत सुधारणा करणे व नव्याने विकसित होणाऱ्या भागात जलनि:सारण नलिका टाकणे, महापालिका हद्दीत आवश्यक ठिकाणी रस्त्याला फुटपाथ करणे, प्रभाग क्र. ५ मधील मनपाच्या ताब्यात असलेले आरक्षण व इमारतीचे नुतनीकरण करणे, विविध ठिकाणचे वापरात नसलेले, दुरावस्थेत व मोडकळीस आलेल्या सार्वजनिक आणि सामुदायिक शौचालयांचे सर्वेक्षण करून निष्कासित करणे, प्रभाग क्र. २६ कस्पटेवस्ती, कावेरीनगर, वेणूनगर व इतर परिसरात विविध स्थापत्य विषयक कामे करणे, प्रभाग क्र. १३ निगडी गावठाण येथील विविध ठिकाणी यमुनानगर दावाखान्याअंतर्गत ओपीडी, जिजाऊ क्लिनिक विकसित करणे, आवश्यक ठिकाणी नवीन स्ट्राँर्म वॉटर लाईन विषयक कामे करणे, पिंपरी येथील काळेवाडी ब्रिज लगत असलेल्या स्मशानभूमीमध्ये गॅस दाहिनी बसविणे आदी विषयांना देखील प्रशासक सिंह यांनी मान्यता दिली.








