एमआयटी एडीटी विद्यापीठात प्रजासत्ताक दिन उत्साहात


लोणी-काळभोर, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – येथील एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठ, विश्वराजबाग, पुणेतील मॅनेट इमारतीच्या प्रांगणात ७६व्या प्राजसत्ताकदिन मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात विशिष्ट सेवा मेडल प्राप्त(व्हीएसएम) लेफ्टनंट जनरल राजीव चौधरी (निवृत्त) यांच्या हस्ते ध्वजरोहण सोहळ्याने झाली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी नृत्य आणि देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण करून प्रसंगी उपस्थिती सर्वांना मंत्रमुग्ध केले.



यावेळी एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कुलगुरु प्रा.डॉ.राजेश एस., कार्यकारी संचालक प्रा.डाॅ.सुनीता कराड, विद्यापीठाचे प्र.कुलगुरू डॉ.मोहित दुबे, डॉ.रामचंद्र पुजेरी, कुलसचिव डॉ.महेश चोपडे, मॅनेटचे प्राचार्य कॅप्टन प्रेरित मिश्रा, विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डाॅ.सुराज भोयार आदी मान्यवर उपस्थित होते.

या प्रसंगी बोलताना लेफ्टनंट जनरल चौधरी म्हणाले, भारत हा खऱ्या अर्थाने विविधतेत एकता असणारा देश आहे. ही विविधता भाषा, धर्म, संस्कृती, वयोमान या सर्व पैलूंवर फुलत जाते. तीच मला आज एमआयटी एडीटी विद्यापीठात अनुभवायला मिळाली. विद्यार्थ्यांनो कायम लक्षात ठेवा आयुष्यात कष्टाला पर्याय नाही. यश व अपयश या नाण्याच्या दोन बाजू असतात. त्यामुळे, अपयशाने खचून न जाता सातत्यपूर्ण प्रयत्न करणाऱ्याला यश नक्की मिळत. त्यामुळे स्वतःच्या कर्माशी प्रामाणिक राहण्याचा सल्लाही त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.
याप्रसंगी बोलताना, प्रा.डॉ. कराड म्हणाल्या, आजचा हा दिवस भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्यविरांची आठवण काढण्याचा, त्यांना नमन करण्याचा आहे. गतवर्ष भारतीय लोकशाहीसाठी उल्लेखनिय ठरले व अनेक आघाड्यांवर भारताने प्रगती केली आहे. त्यामुळे, भारतीयांनी स्वातंत्र्यानंतर मिळालेल्या अधिकारांचा सदुपयोग करावा व आपल्या विकसित देशाच्या वाटचालीत हातभार लावावा, असे आवाहनही त्यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सुत्रसंचलन व आभार विद्यापीठाच्या महाराष्ट्र नौदल शिक्षण आणि प्रशिक्षण अकादमीच्या (मॅनेट) कॅडेट्सकडून करण्यात आले.








