हिंजवडीतील लक्ष्मी चौकामधील अनधिकृत बांधकामावर पीएमआरडीएची कारवाई


पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – हिंजवडी भागातील लक्ष्मी चौकात अनधिकृत पत्राशेड, बांधकामांवर पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या पथकाकडून शुक्रवारी (दि.१७) निष्कासनाची कारवाई करण्यात आली. अनधिकृतपणे उभारलेले अनेक बांधकामावर पीएमआरडीएच्या अनधिकृत बांधकाम व निर्मुलन विभागाने कारवाई केली. या कारवाईमुळे निश्चितच या भागातील वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.



हिंजवडीतील लक्ष्मी चौकात अनधिकृत बांधकामे करण्यात आल्याने रहदारीस अडचणी येत असल्याच्या तक्रारी होत्या. याची दखल घेत पीएमआरडीएच्या अनधिकृत बांधकाम व निर्मुलन विभागाने सार्वजनिक बांधकाम विभागासोबत या भागातील ५० पेक्षा अधिक अनधिकृत पत्राशेड, कठडे, सिमा भिंती, पक्की बांधकामे आदीवर शुक्रवारी (दि.१७) सकाळीपासून सांयकाळपर्यंत निष्कासनाची कारवाई पार पाडली. यावेळी उपस्थित पीएमआरडीएच्या अधिकारी यांचेमार्फत सदर ठिकाणी अनधिकृत बांधकाम करू नये, असे आवाहन करण्यात आले.

संबंधित कारवाई पीएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे, पोलिस अधिक्षक तथा दक्षता अधिकारी अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली अनधिकृत बांधकाम व निर्मुलन विभागाच्या सह आयुक्त (प्र) डॉ. दीप्ती सूर्यवंशी – पाटील, उपजिल्हाधिकारी प्रमोद कुदळे, तहसीलदार सचिन मस्के, तहसीलदार राजेंद्र रांजणे, पोलिस निरीक्षक महेशकुमार सरतापे, कनिष्ठ अभियंता, पोलिस कर्मचारी यांनी पार पाडली. प्राधिकरणाच्या हद्दीतील अनधिकृत होर्डिगसह अनधिकृत बांधकामांचा सर्व्हे करण्यात येत असून त्यांच्यावर निष्कासनाची कारवाई करण्यात येणार असल्याचे पीएमआरडीएने स्पष्ट केले.
नागरिकांनी स्वतःहून काढून घेतले अतिक्रमण
पीएमआरडीएच्या या कारवाईदरम्यान हिंजवडी भागातील लक्ष्मी चौकात शुक्रवारी नवले ब्रिज भागातील कारवाईनंतर सर्वात मोठी निष्कासनाची कारवाई झाली. यात 50 पेक्षा अधिक अतिक्रमणे निष्कासित करण्यात आली असून यासोबतच साधारण 50 इतर अतिक्रमणधारकांनी स्वतःहून आपली अतिक्रमणे काढून घेत प्रशासनाला सहकार्य केले.
वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी प्रयत्न
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून शहरासह परिसरातील वाहतूक कोंडी सोडवण्याच्या दृष्टीने उपाययोजना करण्यात येत आहे. यात जी अतिक्रमणे वाहतूक कोंडीला बाधक ठरत आहे, ते काढण्याच्या दृष्टीने तातडीने पावले उचलण्यात येत आहेत. यासह इतर अनाधिकृत बांधकामे, होल्डिंग, पत्राशेड आदीवर देखील सातत्याने कारवाई करण्यात येत आहेत.








