वाकड-हिंजवडी भागातील वाहतुकी कोंडीवर उपाय म्हणून पीएमआरडीए करणार नवीन रस्ते व वाहतुकीचे नियोजन


आमदार शंकर जगताप यांच्या पुढाकाराने झालेल्या बैठकीत निर्णय



शेतकऱ्यांना जमीन परतावा, वाकड क्रीडांगण, मेट्रो स्थानक नामांतराबाबतही चर्चा

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – वाकड, हिंजवडी, पुनावळे, ताथवडे, माण, म्हाळुंगे या भागात सातत्याने होणाऱ्या वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी पीएमआरडीएच्या विकास आराखड्यात बदल करून काही नवीन रस्त्यांचे नियोजन करण्याचा तसेच आवश्यक ठिकाणी पूल बांधून वाहतुकीचेही नव्याने नियोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती आमदार शंकर जगताप यांनी दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली वाटचाल करीत असताना पहिल्या शंभर दिवसांत राबवावयाच्या विविध उपक्रमांचा एक भाग म्हणून आमदार जगताप यांनी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) कार्यालयात महत्त्वाची बैठक घेतली. विधानसभा निवडणुकीत मतदारांना दिलेल्या वचनांची पूर्तता करण्याच्या दिशेने आमदार जगताप यांनी पावले टाकण्यास जोरदार सुरूवात केली आहे.
पीएमआरडीए कार्यालयात झालेल्या या बैठकीस आमदार शंकर जगताप, पीएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे, मुख्य अभियंता (अभियांत्रिकी-१) अशोक भालकर सहआयुक्त हिम्मत खराडे, उपसंचालक व महा नियोजनकार श्वेता पाटील, मुख्य अभियंता (अभियांत्रिकी- २) रिनाज पठाण तसेच माजी नगरसेवक विनायक गायकवाड, संदीप कस्पटे, जिल्हा नियोजन समिती सदस्य काळूराम नढे, भारतीय जनता पक्षाचे मंडल अध्यक्ष सोमनाथ भोंडवे, दीपक भोंडवे, सचिन शिवले, संदीप शिवले, वाल्मिक शिवले, कुणाल भोंडवे, अमोल शिंदे, प्रवीण सिंग, राजेंद्र राऊळ, अजय भोंडवे, अभिजित गायकवाड आदी उपस्थित होते.
1. वाहतूक कोंडी संबंधित उपाययोजना
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आणि पीएमआरडीए हद्दीतील वाकड, पुनावळे, ताथवडे, हिंजवडी, मान, आणि म्हाळुंगे या भागांमध्ये वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी उपाययोजनांवर सविस्तर चर्चा झाली.
– पीएमआरडीएच्या विकास आराखड्यात बदल करून नवीन रस्त्यांचे नियोजन करण्याचे ठरले.
– नाल्यावर पूल उभारणे, तसेच वाढत्या नागरीकरणाच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीचे नियोजन करणे.
– आवश्यकतेनुसार रस्त्यांची लांबी-रुंदी वाढवणे आणि नदीकाठच्या भागात रिव्हर फ्रंट विकसित करणे यावर भर देण्यात आला.
वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी लोकप्रतिनिधी, आमदार आणि पीएमआरडीए आयुक्त यांच्या संयुक्त पाहणी दौऱ्याचे नियोजन करण्यात आले.
2. शेतकऱ्यांच्या जमिनींचा परतावा आणि तंत्र प्रक्रिया सुलभता
पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाने संपादित केलेल्या जमिनींच्या मोबदल्याबाबत सविस्तर चर्चा झाली.
– शेतकऱ्यांच्या जमिनींच्या परताव्यासाठी जिल्हाधिकारी, पीएमआरडीए, आणि शेतकऱ्यांचे प्रतिनिधी यांच्यासोबत संयुक्त बैठक आयोजित करण्याचे ठरले.
– 14 मार्च 2024 च्या शासन निर्णयानुसार, 106 शेतकऱ्यांना 6.25% जमीन परतावा देण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची यादी वेबसाईटवर प्रकाशित करण्याचे निर्देश देण्यात आले.
– शेतकऱ्यांना राखीव भूखंडाविषयी सविस्तर माहिती देण्यासाठी कार्यपद्धती ठरविण्यात आली.
3. वाकडमधील क्रीडांगण विकास
– वाकड येथील शासकीय भूखंड महानगरपालिकेला हस्तांतरित करून त्या ठिकाणी क्रीडांगण विकसित करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला.
4. मेट्रो स्थानकांच्या नामांतराबाबत चर्चा
– हिंजवडी मान परिसरातील मेट्रो स्थानकांचे नाव “शिवाजी चौक” ऐवजी “छत्रपती शिवाजी महाराज चौक” असे करण्याचा ठराव मांडण्यात आला.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याप्रति जनतेच्या भावना लक्षात घेऊन, हा प्रस्ताव पीएमआरडीएमार्फत केंद्र सरकारकडे पाठवण्याचे निर्देश आमदार शंकर जगताप यांनी दिले.
बैठकीत विविध विषयांवर सखोल चर्चा होऊन प्रलंबित कामे मार्गी लावण्यासाठी ठोस उपाययोजना निश्चित करण्यात आल्या. या बैठकीत घेतलेले निर्णय शहराच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत.








