ताज्या घडामोडीपिंपरी
सर्वांचे प्रेम हेच जीवनाचे संचित!” – डॉ. श्रीपाल सबनीस


अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त विशेष सत्कार संपन्न
पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – “सर्वांचे प्रेम हेच माझ्या जीवनाचे संचित आहे!” असे कृतार्थ उद्गार ज्येष्ठ विचारवंत आणि साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस यांनी संत तुकारामनगर, पिंपरी येथे व्यक्त केले .
सोहम् सार्वजनिक ग्रंथालयाच्या वतीने आयोजित केलेल्या डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त विशेष सत्कार सोहळ्यात ज्येष्ठ साहित्यिक श्रीकांत चौगुले यांनी डॉ. सबनीस यांच्याशी मुलाखतीच्या माध्यमातून मुक्तसंवाद साधला. त्यापूर्वी, संतसाहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. शिवाजीराव मोहिते यांच्या अध्यक्षतेखालील आणि महाराष्ट्र कामगार साहित्य परिषदेचे अध्यक्ष पुरुषोत्तम सदाफुले यांच्या हस्ते डाॅ. श्रीपाल सबनीस यांचा सन्मानचिन्ह, शाल, पुष्पगुच्छ आणि ग्रंथ प्रदान करून विशेष सत्कार करण्यात आला. याप्रसंगी सोहम् सार्वजनिक ग्रंथालयाचे संस्थापक – अध्यक्ष जगन्नाथ नेरकर आणि कलारंजन प्रतिष्ठान, नवी सांगवीचे अध्यक्ष श्रीकांत चौगुले यांची व्यासपीठावर तसेच बाबा भारती प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेंद्र भारती, राजमाता अहिल्यादेवी शिक्षण संस्थेचे संस्थापक व्यंकटेश वाघमोडे, ललिता सबनीस, कामगारनेते अरुण गराडे, प्रा. बी. आर. माडगूळकर, पंकज पाटील, सुभाष चव्हाण, आत्माराम हारे आणि स्पर्धा परीक्षांचे अभ्यासक विद्यार्थी यांची सभागृहात उपस्थिती होती.
पुरुषोत्तम सदाफुले यांनी मनोगतातून, “आयुष्यभर माणसे जोडण्याचे काम डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले!” असे विचार मांडले; तर डॉ. शिवाजीराव मोहिते यांनी अध्यक्षीय मनोगतातून, “व्यासपीठावरून मांडलेले विचार आपल्या आचरणात आणून विचारांचे मूल्य आणि गांभीर्य डॉ. सबनीस यांनी नेहमी जोपासले आहे!” असे गौरवोद्गार काढले.
प्रकट मुलाखतीच्या माध्यमातून श्रीकांत चौगुले यांच्या मार्मिक प्रश्नांना डॉ. सबनीस यांनी दिलखुलासपणे उत्तरे दिली अन् त्यातून त्यांचा जीवनपट उलगडत गेला. घरची ११० एकर शेती, गढीसारखा वाडा, जमीनदार वडिलांचा लाभलेला सरंजामशाही वारसा, किशोरावस्थेत भजन – कीर्तनाची लागलेली गोडी, ऐन तारुण्यात मार्क्सवादाच्या आकर्षणातून रचलेली क्रांतीची गीते अन् त्यामुळे एका प्रसंगी ‘नक्षलवादी’ असा झालेला उल्लेख हे कथन करीत सबनीस पुढे म्हणाले की, प्रबंधलेखन (पीएच. डी.) करताना आंबेडकरवादाचा सखोल अभ्यास केला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला अभिप्रेत असलेल्या हिंदुवादाचा अभ्यास केला. केवळ हिंदुधर्मातीलच नव्हे तर बौद्ध, मुस्लीम, ख्रिश्चन, जैन अशा विविध धार्मिक ग्रंथांचा अभ्यास केला. सर्व धर्मातील मूल्ये उच्च प्रतीची आहेत; पण सर्वांमध्ये अनिष्ट प्रथा आहेत. त्याचबरोबर सर्व महापुरुष वंदनीय असले तरी कोणताही महापुरुष परिपूर्ण नाही. उजव्या विचारवंतांची वैचारिक भूमिका मान्य होण्यासारखी नसली तरी त्यांच्यातील कृतिशीलता महत्त्वाची वाटते; तर डाव्या विचारवंतांची वैचारिक निष्ठा आदरणीय वाटली तरी त्यांच्यातही काही दांभिक वाटले. पिंपरी येथे संपन्न झालेले ८९वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन ‘न भुतो न भविष्यती’ असे होते.
आजतागायत ७६ ग्रंथांचे लेखन, ५०० हून अधिक प्रस्तावना, १६०० हून अधिक व्याख्याने यांमधून मी सत्याचा सातत्याने पाठपुरावा करीत चांगल्या विचारांची गोळाबेरीज करण्याचा प्रयत्न करतो आहे. यामध्ये प्रारंभी टीका झाली तरी आता सर्वांकडून प्रेमाची, आपुलकीची अनुभूती मिळते आहे. प्रा. नरहर कुरुंदकर यांसारखे गुरू तसेच पत्नी ललिता सबनीस यांची साथ लाभली आहे, अशी कृतज्ञताही त्यांनी व्यक्त केली. तसेच संमेलन पूर्वकाळातील वक्तव्य त्यातून निर्माण झालेले वादंग यावरही परखड भाष्य केले. याचबरोबर ललित लेखनातून वैचारिकणलेखनापर्यंतचा प्रवास उलगडताना काही किस्से व आठवणी त्यांनी जागवल्या.
जगन्नाथ नेरकर यांनी प्रास्ताविक केले. प्रदीप गांधलीकर यांनी सूत्रसंचालन केले. शिरीष पडवळ यांनी आभार मानले.








