स्वच्छता मोहिमेच्या माध्यमातून १० हजार ४४५ किलो कचऱ्याचे संकलन


नागरिकांना स्वच्छता मोहिमेत सहभागी होण्याचे महापालिकेचे आवाहन



पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने शहरातील विविध नदी घाटांवर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली असून या मोहिमेच्या माध्यमातून १० हजार ४४५ किलो कचऱ्याचे संकलन असून शहराला स्वच्छ व सुंदर बनविण्यासाठी शहराच्या विविध भागात महापालिकेच्या वतीने जानेवारी महिन्याच्या प्रत्येक शनिवारी स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांनी दिली.
स्वच्छ महाराष्ट्र आणि भारत अभियान (नागरी) अंतर्गत आयुक्त शेखर सिंह मार्गदर्शनाखाली शहरातील “नदी/तळे/घाट आदी पाण्याची ठिकाणे व परिसर स्वच्छता” मोहीम राबविण्यात येत आहे. त्यानुषंगाने शहरातील ब,क,ड,इ,ग,ह या क्षेत्रीय कार्यालयांच्या हदीतून वाहणाऱ्या मुळा, पवना आणि इंद्रायणी नदीच्या घाटांवर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यावेळी हजारो किलो कच-याचे संकलन करण्यात आले. येत्या १८ व २५ जानेवारी२०२५ रोजी शहरात विविध ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार असल्याचेही खोराटे यांनी सांगितले. यावेळी स्वच्छता मोहिमेत सहभागी सर्वांनी शहराला स्वच्छ ठेवण्यासठी “माझी वसुंदरा” ही सामुहिक शपथ घेतली.

ब क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत मामुर्डी पवना नदी घाट, चिंचवडगाव थेरगाव पुल, किवळे महादेव मंदिर, पवना नदी, किवळे म्मशानभूमी, मळेकर वस्ती घाट, जाधव घाट रावेत येथील मोहिमेत सुमारे ३ हजार ९८५ किलो कचरा संकलित करण्यात आला. क क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत चिखली विसर्जन घाटावर ७८० किलो तर ड क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत म्हातोबा मंदिर वाकड याठिकाणी १ हजार ५०० किलो कचऱ्याचे संकलन करण्यात आले. तसेच इ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत च-होली घाटाजवळ इंद्रायणी नदी १ हजार ६०० किलो कचऱ्याचे संकलन करण्यात आले. ग क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत सुभाष घाट, थेरगाव म्मशानभुमी, वैभवनगर घाट, पिंपरीगाव घाट याठिकाणी सुमारे ८९० किलो कचऱ्याचे संकलन करण्यात आले. ह क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत फुगेवाडी, कासारवाडी, पावनाघाट, हॅरीश ब्रिज याठिकाणी सुमारे १ हजार ६९० किलो कचऱ्याचे संकलन करण्यात आले असून एकूण १० हजार ४४५ किलो कचऱ्याचे संकलन या मोहिमेच्या माध्यमातून आज करण्यात आले असल्याची माहिती आरोग्य कार्यकारी अधिकारी गणेश देशपांडे यांनी दिली आहे.
कचरा व्यवस्थापनासाठी तुमचा खारीचा वाट उचला आणि स्वच्छतेचा संकल्प करून आपल्या शहराला कचरामुक्त शहर बनवूया, असे आवाहन नागरिकांना उप आयुक्त सचिन पवार यांनी केले आहे.
या मोहिमेसाठी क्षेत्रीय कार्यालयातील अधिकारी कर्मचारी यांच्यासह प्रभागातील माजी पदाधिकारी, स्वच्छता दुत,नागरिक, शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी, सेवाभावी संस्था, महिला बचत गट यांनी मोठ्या संख्येने या मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन महापालिकेच्या वतीने अतिरिक्त आयुक्त खोराटे यांनी केले आहे.








