हिंदू वीरशैव लिंगायत मंचच्यावतीने आयोजित कार्यक्रमात 75 शिवाचार्याच्या हस्ते महाआरती संपन्न


– समाज, राष्ट्रहितासाठी विविध ठराव संमत



पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – हिंदू वीरशैव लिंगायत मंचच्या वतीने राष्ट्राच्या हितासाठी, समृद्धीसाठी एक दिवशीय संत समावेश या विशेष कार्यक्रमाचे आयोजन मल्लिकार्जुन मंदिर, निगडी प्राधिकरण येथे करण्यात आले होते. याप्रसंगी महाराष्ट्रा सह कर्नाटकातील वीरशैव लिंगायत समाजातील 75 शिवाचार्य यांच्या उपस्थितीत महाआरती संपन्न झाली तसेच समाज आणि राष्ट्र हितासाठी विविध ठराव मंजूर करण्यात आले.

श्री. ष. ब्र. 108 डॉ. विरुपाक्षे शिवाचार्य स्वामीजी, मुखेड, श्री. ष. ब्र. 108 संगणबसव शिवाचार्य महायस्वामीजी, मणगुळी, कर्नाटक श्री. ष. ब्र. सिडधाराम महास्वामीजी विरक्त मठ, मसमनाळ, कर्नाटक यांच्यासह हिंदू वीरशैव लिंगायत मंच चे पदाधिकारी हेमंतराव हरहरे, अण्णाराय बिराजदार, एस. बी. पाटील, दानेश तीमशेट्टी, गुरुराज चरंतीमठ, अजय मुंगडे,नारायण बहिरवाडे,गुरुराज कुंभार, दत्तात्रय बहिरवाडे,राजेंद्र हिरेमठ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा कार्यवाह महेश्वर मराठे आदि मान्यवर उपस्थित होते.
महाआरती पूर्वी दत्तोपंत म्हस्कर न्यासाचे अरविंद – वृंदा सभागृह येथे झालेल्या विशेष चर्चासत्र आणि परिसंवादामध्ये आज देशात साधू, संतांवर होत असलेल्या अन्याय, अत्याचाराला आला घालण्यासाठी, समाजातील समस्या निवारून समृद्ध समाजनिर्मितीसाठी करावयाच्या उपाय योजनावर चर्चा करण्यात आली.
परिसंवादाचे बीज भाषण करताना महेश्वर मराठे म्हणाले, धर्माची ग्लानी दूर करण्यासाठी हिंदू समाजाने एकत्र येण्याची गरज आहे. भ्रम निर्माण करण्याच्या रूपाने हिंदू धर्मावर पहिले आक्रमण झाले आहे, याशिवाय व्होट जिहाद, जमीन जिहाद आणि लव्ह जिहाद हिंदू धर्मावर अतिक्रमण सुरू आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकातील संताच्या माध्यमातून हिंदू समाज एकत्र आल्याशिवाय समाज टिकणार नाही असेही मराठे यांनी नमूद केले.
देशाच्या आगामी जनगणनेत हिंदू समाजाची संख्या घटणार नाही यासाठी सर्व समाजाने आपली नोंद हिंदू म्हणून करण्यासाठी सर्व संतांनी समाजाला जागृत करण्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. तसेच हिंदू वीरशैव लिंगायत मंच चा महाराष्ट्राबाहेर कर्नाटकात विस्तार करण्यासाठी एक समिती नेमून आराखडा तयार करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला.
धर्मांतर रोखण्यासाठी आणि यापूर्वी धर्मांतरीत झालेल्या समाज बांधवांना पुन्हा समाजात आणण्यासाठी आवश्यक ती पावले उचलून उपाययोजना करण्यास सर्व संतानी एकमताने मंजूरी दिली. तसेच संताचे एकत्रीकरण करण्यासाठी आजच्या कार्यक्रम प्रमाणे कर्नाटकात बिजापूर किंवा बागलकोट जिल्ह्यात संत समावेश कार्यक्रम घेण्याचे निश्चित करण्यात आले.
‘संत समावेश’ कार्यक्रमाच्या सांगता समारंभापूर्वी मल्लिकार्जुन मंदिर ते महात्मा बसवेश्वर पुतळा या दरम्यान 75 शिवाचार्य यांची भव्य पदयात्रा काढण्यात आली, यामध्ये बॅंड पथक, बाल वारकरी,महिला आणि समाज बांधव यांचा समावेश होता. महात्मा बसवेश्वर यांना अभिवादन करून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.








