आता सोसायटी अध्यक्षांकडे पाठविली जाणार सोसायटी मधील थकबाकीदारांची यादी !


मालमत्ता कर थकीत असणाऱ्या मालमत्ताधारकांनी त्वरित मालमत्ता कराचा भरणा करण्याचे करसंकलन विभागाचे आवाहन



पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागामार्फत आकारणी न झालेल्या मालमत्तांचे नोंदणी व करआकारणी कार्यवाही करण्यासाठी मे. स्थापत्य कन्सल्टंट प्रा.लि या खासगी कंपनीची नेमणूक करण्यात आली असून, त्यांच्यामार्फत शहरातील मालमत्तांचे सर्वकष सर्वेक्षण सुरू आहे. मालमत्तांच्या सर्वकष सर्वेक्षणामध्ये ६४,२६० मालमत्तांची नव्याने आकारणी करण्यात आली असून, त्या मालमत्तांना मालमत्ताकराचे बिलसुध्दा बजाविणेत आले.
मालमत्ता सर्वेक्षणामध्ये नव्याने आकारणी झालेल्या मालमत्तांमध्ये ६९० सोसायट्यांमधील ५६,२३२ मालमत्तांना मालमत्ताकराचे बिल बजाविणेत आले असून यामधून ६५१ सोसायटीमधील ३६९८० मालमत्ताधारकांचा ६९.५६ कोटींचा कर थकीत आहे. थकबाकी असणाऱ्या मालमत्ताधारकांना एसएमएस, टेलिकॉलिंग यामाध्यमातून कराचा भरणा करण्याचे आवाहन वारंवार करसंकलन विभागाकडून करण्यात येत आहे.
शहरातील थकबाकी असणाऱ्या ६५१ सोसायटींचे अध्यक्ष तथा चेअरमन यांना त्यांच्या सोसायटीमधील थकबाकी असणाऱ्या मालमतांधारकांची संपूर्ण माहिती उदा. थकीत मालमत्ताधारकाचे नाव, थकीत रक्कम इ. करसंकलन विभागाकडून पाठविण्यात येणार असून, थकबाकी असणाऱ्या मालमत्ताधारकांची यादी सोसायटीच्या नोटीस बोर्ड, सोसायटी व्हाट्सअप ग्रुपमध्ये पाठवून, तसेच ज्यांची कराची थकीत रक्कम आहे ; अशा सोसायटीच्या सभासदांना कराचा भरणा करण्यासाठी त्यांनी आवाहन करावे असे करसंकलन विभागाकडून सोसायटी अध्यक्षांना कळविण्यात आले आहे.

कोट –
“शहरातील आकारणी न झालेल्या मालमत्तांची नोंदणी व करआकारणी कार्यवाही करण्यासाठी मे. स्थापत्य कन्सल्टंट प्रा.लि या खासगी कंपनीकडून मालमत्तांचे सर्वकष सर्वेक्षण करण्यात येत आहे. नव्याने आकारणी झालेल्या सोसायट्यामधील मालमत्ताधारकांना कराचा भरणा करण्यासाठी वारंवार विविध माध्यमातून आवाहन करण्यात येत आहे. परंतू अद्यापही कराचा भरणा न केलेल्या सोसायट्यांमधील मालमत्तांची यादी संबंधित सोसायटी अध्यक्षांना पाठविण्यात येणार असून, सोसायटी अध्यक्षांनी सोसायटीमधील थकबाकी असणाऱ्या मालमत्ताधारकांना तात्काळ कराचा भरणा करण्याचे आवाहन करुन सहकार्य करावे.”
प्रदीप जांभळे पाटील, अतिरिक्त आयुक्त (१), पिंपरी- चिंचवड महानगरपालिका
कोट – करसंकलन विभागाकडून नव्याने करण्यात आलेल्या मालमत्ता सर्वेक्षणामध्ये नव्याने आकारणी झालेल्या सोसायट्यांमधील मालमत्तांधारकांकडे तब्बल ६९.५६ कोटीचा कर थकीत आहे. शहरातील सोसायट्यांच्या अध्यक्षाना करसंकलन विभागाकडून सोसायटीमधील अद्याप कराचा भरणा न केलेल्या मालमत्ताधारकाची यादी कराच्या थकीत रकमेसह सोसायटी अध्यक्षांना पाठविण्यात येणार आहे. संबंधित सोसायटी अध्यक्षांनी त्यांना पाठविण्यात आलेली यादी सोसायटीच्या ठळक जागी, नोटीस बोर्ड व सोसायटी व्हाट्सअप ग्रुपवर पाठवून, तसेच सोसायटीच्या ज्या सभासदाकडे कराची रक्कम थकीत त्यांनी ती तात्काळ ऑनलाईन प्रणालीद्वारे भरणा करण्यासाठी सोसायटीच्या अध्यक्षांनी पुढाकार घ्यावा असे त्यांना आवाहन करण्यात येत आहे
अविनाश शिंदे, सहाय्यक आयुक्त, कर आकारणी व कर संकलन विभाग, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका








