राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन


सावित्रीबाई फुले हे नाव केवळ एका स्त्रीचे नसून, ती एक विचारधारा आहे – योगेश बहल



पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालय खराळवाडी, पिंपरी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी-चिंचवड शहर (जिल्हा) च्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती दिनानिमित्ताने शहराध्यक्ष योगेश मंगलसेन बहल तसेच महिला अध्यक्षा प्रा.सौ.कविता आल्हाट शहरातील प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन तसेच पुष्पहार अर्पन करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी शहराध्यक्ष योगेश बहल आपल्या भाषणात म्हणाले की, सावित्रीबाई फुले या महाराष्ट्राच्या सामाजिक सुधारणा चळवळीतील एक महत्त्वाची व्यक्ती म्हणून ओळखल्या जातात. त्यांनी जात आणि लिंगावर आधारित भेदभाव आणि अन्यायकारक वागणूक नाहीशी करण्यासाठी काम केले आहे. शिक्षणाच्या प्रसारासाठी अन्य सामाजिक क्षेत्रांतही काम करणे गरजेचे आहे, स्त्रियांचा आत्मविश्वास वाढवणे गरजेचे आहे हे सावित्रीबाईंनी ओळखून त्या काळातील समाजातील कठीण परिस्थितीत स्त्री शिक्षण किती गरजेचे व महत्वाचे आहे हा संदेश पोहचविण्याकरिता त्यांनी मुलींची पहिली शाळा सुरू करून काही क्रूर रूढींना सामोरे जात सावित्रीबाईंनी आपले पती ज्योतीराव फुले यांच्या सहकार्याने मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचा धाडसी निर्णय घेतला. सावित्रीबाई या एक लेखिका देखील होत्या, त्यांची काव्यफुले, सुबोध रत्नाकर, बावनकशी अशी विविध पुस्तके देखील प्रकाशित असून त्यांनी मराठी भाषेत लेखन केलेलं आहे. ०३ जानेवारी हा दिवस बालिका दिन म्हणूनही साजरा केला जातो, हा दिवस स्त्री सक्षमीकरणासाठी नवा संकल्प करण्याचा दिवस आहे. आपण सर्वांनी सावित्रीबाईंच्या विचारांचा आदर ठेवून मुलींसाठी एक सुरक्षित आणि शिक्षण संपन्न भविष्य घडवावे याकरिता त्यांच्या जयंती दिवशी त्यांचे स्मरण करून समाजासाठी कार्य करण्याचा आपण संकल्प करूया, त्यांच्या पवित्र स्मृतीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा)च्यावतीने अभिवादन करतो. यावेळी महिला अध्यक्षा प्रा.सौ.कविता आल्हाट यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी शहराध्यक्ष योगेश मंगलसेन बहल महिला अध्यक्षा प्रा.सौ.कविता आल्हाट, मा.सभापती विजय लोखंडे, युवक अध्यक्ष शेखर काटे, विद्यार्थी अध्यक्ष चेतन दुधाळ, प्रदेश उपाध्यक्ष ज्ञानेश्वर कांबळे, महिला वरिष्ठ कार्याध्यक्ष कविता खराडे, व्हीजेएनटी सेल अध्यक्षा निर्मला माने, सुप्रिया सोळांकुरे, शहर उपाध्यक्ष तुकाराम बजबळकर, माऊली मोरे, शहर चिटणीस राजेंद्र म्हेत्रे, महेश ताकवले, धनाजी तांबे, सुनिल आडागळे इत्यादी मान्यवरांसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थितीत होते.








