उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इंद्रायणीच्या प्रदुषणावरून अधिकाऱ्यांना धरले धारेवर


प्रदूषित इंद्रायणी नदीचा मुद्दा तापला



कारखाने, गृहप्रकल्प तसेच पालिकेच्या मैला शुद्धीकरण प्रकल्पाची पाहणी करा

सबंधित आस्थापनांवर प्रसंगी फौजदारी खटले दाखल व्हावेत
शिवसेना उपनेते इरफानभाई सय्यद यांची ‘एमपीसीबी’कडे मागणी
पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – गेल्या सहा ते सात महिन्यांपासून आळंदीमध्ये इंद्रायणी नदी फेसाळत आहे. मध्यंतरी तत्कालिन मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इंद्रायणीच्या प्रदुषणावरून अधिकाऱ्यांना धारेवर धरले होते. तसेच नदी प्रदुषणमुक्त करण्याच्या सूचना केल्या होत्या. यानंतर काही प्रमाणात नदीचे फेसाळणे थांबले होते. पुन्हा आता नदी फेसाळल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
शिवसेना उपनेते तथा कामगार नेते इरफानभाई सय्यद यांनी वारंवार महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (एमपीसीबी) अधिकाऱ्यांना कार्यवाहीबाबत निवेदन दिले आहे. परंतु, प्रशासन केवळ पावले उचलत असल्याचा आव आणत आहे. प्रत्यक्षात नदी वारंवार फेसाळत असल्याने नदीची अवस्था जैसे थे आहे. याबाबत शिवसेना उपनेते तथा कामगार नेते इरफानभाई सय्यद यांनी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या इंद्रायणी नदीच्या प्रदूषणाबाबत पुन्हा एकदा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळास नुकतेच स्मरणपत्र दिले आहे. इंद्रायणी नदीकाठी असणारे कारखाने, गृहप्रकल्प तसेच महापालिकेच्या मैला शुद्धीकरण प्रकल्पाची पाहणी करावी. तसेच जबाबदार घटकांवर फौजदारी खटले दाखल करावेत, अशी मागणी त्यांनी केली आहे.
पत्रकात त्यांनी म्हटले आहे की, ” लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या इंद्रायणी नदीच्या प्रदूषणाचा विषय दिवसेंदिवस गंभीर होत आहे. शनिवारी (दि. २९) रोजी पुन्हा एकदा इंद्रायणी नदीचे पाणी प्रदूषित आणि फेसाळेले दिसून आले. त्यामुळे स्थानिक प्रशासन आणि प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्यावर कार्यपद्धतीवर भाविक भक्तांच्या मनात शंका निर्माण होत आहे.पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतून इंद्रायणी नदीत थेट मैला मिश्रित सांडपाणी आणि उद्योगाचे केमिकल रसायन मिश्रित दूषित पाणी थेट इंद्रायणी नदीत येत आहे. नदी प्रदूषण स्थानिक नागरिक आणि भाविकांच्या आरोग्याला हानिकारक आहे. याबाबत गेल्या वर्षी शिवसेना पक्षाच्या वतीने निवेदन देण्यात आले. त्यावर कोणतेही कार्यवाही झालेली नाही.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने इंद्रायणी नदीकाठी असलेले सर्व कारखाने, गृहप्रकल्प, तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मैला शुद्धीकरण प्रकल्पाची पाहणी करावी. इंद्रायणी नदी प्रदूषणाला जबाबादर तसेच थेट पद्धतीने मैला अथवा रसायन मिश्रित सांडपाणी इंद्रायणीत सोडणाऱ्यांवर फौजदारी खटले दाखल करावेत. महापालिका हद्दीतील गृहप्रकल्पातील बेकायदेशीरपणे मैलमिश्रित पाणी नदीत सोडणाऱ्या आणि या गृहप्रकल्पांना परवानगी देणाऱ्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवरसुद्धा प्रसंगी फौजदारी खटले दाखल करावे, असे या पत्रकात इरफानभाई यांनी म्हटले आहे.
इंद्रायणी नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी योग्य त्या उपाययोजना येत्या १० दिवसात कराव्यात. अन्यथा शिवसेनेच्या वतीने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयात आंदोलन छेडण्यात येईल. मा. इरफानभाई सय्यद (शिवसेना उपनेते तथा कामगार नेते)…








