ताज्या घडामोडीपिंपरी
श्रोत्यांशी सहजसंवाद साधणे हाच यशस्वी निवेदनाचा मूलमंत्र! – सुधीर गाडगीळ


पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – “अनौपचारिकपणे साध्या अन् सोप्या शब्दांतून श्रोत्यांशी सहजसंवाद साधणे हाच यशस्वी निवेदनाचा मूलमंत्र होय!” असे मत ज्येष्ठ निवेदक सुधीर गाडगीळ यांनी शाहीर योगेश रंगमंच, पुनरुत्थान समरसता गुरुकुलम्, चिंचवडगाव येथे व्यक्त केले.
सुधीर गाडगीळ यांच्या अमृतमहोत्सव वर्षानिमित्त तसेच त्यांच्या निवेदन क्षेत्रातीलसुवर्णमहोत्सवानिमित्त कलारंजन प्रतिष्ठान, नवी सांगवी या संस्थेमार्फत आयोजित करण्यात आलेल्या विशेष सत्काराला उत्तर देताना गाडगीळ बोलत होते.
ज्येष्ठ समाजसुधारक पद्मश्री गिरीश प्रभुणे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते; तसेच सुप्रसिद्ध नर्तक आणि संस्कारभारती, पिंपरी – चिंचवड शाखाध्यक्ष पंडित डॉ. नंदकिशोर कपोते, कलारंजन प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रीकांत चौगुले, कार्याध्यक्ष शिरीष पडवळ यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. त्याचबरोबर पिंपरी – चिंचवड परिसरातील विविध साहित्य आणि सांस्कृतिक संस्थांचे पदाधिकारी सभागृहात उपस्थित होते.
याप्रसंगी बुद्धिमत्तेचे प्रतीक असलेली पुणेरी पगडी, मोरया गोसावी यांच्या आध्यात्मिक वारशाचे प्रतीकात्मक उपरणे, सन्मानचिन्ह आणि पुष्पगुच्छ प्रदान करून सुधीर गाडगीळ यांचा विशेष सत्कार करण्यात आला. डॉ. नंदकिशोर कपोते यांनी आपल्या मनोगतातून आपल्या अनेक सांस्कृतिक मैफिलींना गाडगीळ यांच्या खुमासदार निवेदनाची साथ लाभली, असे सांगून त्या आठवणींना उजाळा दिला. गिरीश प्रभुणे यांनी अध्यक्षीय मनोगतातून, “सुधीर गाडगीळ हे सांस्कृतिक महाराष्ट्राचा चालताबोलता इतिहास आहे!” असे गौरवोद्गार काढले.
सत्कारानंतर श्रीकांत चौगुले यांनी मार्मिक प्रश्नांच्या माध्यमातून सुधीर गाडगीळ यांच्याशी मुक्तसंवाद साधला. त्यातून पु. ल. देशपांडे यांच्या गप्पा मारण्याच्या शैलीतून जनसमुदायाशी संवाद साधण्याच्या कलेने आपण निवेदन क्षेत्राकडे वळलो. १९७२ मध्ये ‘मंतरलेल्या चैत्रबनात’ या सांगीतिक कार्यक्रमाच्या निवेदनाला अमाप लोकप्रियता लाभली. त्यामुळे पत्रकारितेची नोकरी सोडून पूर्ण वेळ व्यावसायिक निवेदक म्हणून करिअर करण्याचा निर्णय घेतला; आणि मध्यमवर्गीय कुटुंबातील असूनही माझ्या निर्णयाला घरातून पाठिंबा मिळाला. पन्नास वर्षांहून अधिक काळ निवेदक म्हणून काम करताना सुमारे साडेसहा हजार मुलाखती घेतल्या. त्यामध्ये पंतप्रधान, राष्ट्रपती, नाट्य – चित्रपट कलावंत, राजकारणी, समाजकारणी, साहित्यिक, संपादक अशा विविध क्षेत्रांतील व्यक्तींचा समावेश आहे. दूरदर्शनवरील ‘आमची पंचविशी’ यासारखे कार्यक्रम खूप लोकप्रिय झालेत. रोजनिशी लिहिण्याची सवय असल्याने त्यांतून सोळा पुस्तकांचे लेखन झाले, अशी माहिती खुसखुशीत शैलीतून कथन करीत गाडगीळ यांनी राष्ट्रपती ए. पी. जे. अब्दुल कलाम, इंदिरा गांधी, बाळासाहेब ठाकरे, मंगेशकर कुटुंबीय, पंडित भीमसेन जोशी, पंडित वसंतराव देशपांडे, दादा कोंडके, गोविंद तळवलकर अशा दिग्गजांच्या आठवणींचे खास किस्से सांगितले. ‘पुण्यात सांस्कृतिक स्थित्यंतर झाले असले तरी गुणवत्तेचा अभाव जाणवतो!’ अशी खंत व्यक्त करून, ‘पालकांनी मुलांच्या सुप्तगुणांना वाव द्यावा!’ अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
ज्येष्ठ कवयित्री शोभा जोशी यांनी अटलबिहारी वाजपेयी यांच्या कवितेचे अभिवाचन केले. शिरीष पडवळ यांनी प्रास्ताविक केले. गाडगीळ यांच्या हस्ते शहरातील निवेदकांचा प्रातिनिधिक सत्कार करण्यात आला. प्रदीप गांधलीकर यांनी सूत्रसंचालन केले. कलारंजनचे कार्यवाह आर. बी. पाटील यांनी आभार मानले.








