कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त इंदूराणी जाखड यांची महापालिकेच्या विविध प्रकल्पांना भेट


पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी चिंचवड महापालिकेचे नाविन्यपूर्ण प्रकल्प, पायाभूत सुविधा आणि विविध महत्वाकांक्षी उपक्रमांमुळे शहराच्या शाश्वत विकासामध्ये लक्षणीय प्रगती झाली असून त्यामुळे नागरिकांचे जीवनमान उंचावण्यास देखील मदत झाली आहे. अशाच सर्वसमावेशक लोककल्याणकारी धोरणांचा अवलंब करून अंमलबजावणी करण्याचा आमचा प्रयत्न राहील, असे कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आयुक्त इंदूराणी जाखड म्हणाल्या.



पिंपरी चिंचवड महापालिकेचे विविध प्रकल्प, उपक्रम आदी ठिकाणी कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आयुक्त इंदूराणी जाखड (आयएएस) यांच्यासह त्यांच्या शिष्टमंडळाने पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीस भेट देऊन विविध प्रकल्पांची माहिती घेतली, त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी कल्याण डोंबिवली महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे, हर्षल गायकवाड, शहर अभियंता अनिता परदेशी, उप आयुक्त अतुल पाटील, रमेश मिसाळ, स्वाती देशपांडे, अवधूत तावडे, कार्यकारी अभियंता संदिप तांबे, योगेश गोटेकर, प्रमोद मोरे, उपअभियंता प्रसाद सुखदेव, सहाय्यक अभियंता राहुल म्हात्रे, पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह, शहर अभियंता मकरंद निकम, उप आयुक्त अण्णा बोदडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, सहाय्यक आयुक्त श्रीकांत कोळप, विजयकुमार थोरात, प्रशासन अधिकारी संगिता बांगर यांच्यासह महापालिकेचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

आयुक्त जाखड म्हणाल्या, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने शहरात उभारण्यात आलेल्या प्रकल्पांची आणि उपक्रमांची माहिती करून घेऊन अनुभव घेणे प्रेरणादायी ठरले. कचऱ्यापासून वीजनिर्मिती, कचऱ्यापासून बायोगॅस यांसारखे महत्वाकांकक्षी प्रकल्प हे शहरी शाश्वततेला आत्मसात करून आव्हानांना संधीमध्ये कसे बदलू शकतात याचे उत्कृष्ट उदाहरण आहे. यासोबतच दिव्यांग भवन सारखे प्रकल्प सर्व समाजघटकांना सन्मानपूर्वक वागणूक देऊन त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केलेल्या प्रयत्नाचे आणि वचनबद्धतेचे प्रतीक आहे. यासोबत शिक्षण विभागाने शिक्षणाच्या गुणवत्तेमध्ये सुधारणा करण्यासाठी केलेल्या उपक्रमांपासून ते पर्यावरण विभागाच्या वतीने राबविण्यात आलेले हरित उपक्रम आणि अग्निशमन विभागाच्या सुरक्षा उपाययोजनांमधील प्रगत तंत्रांपर्यंत महापालिकेचा विकासाच्या दृष्टीने व्यापक आणि सर्वसमावेशक दृष्टिकोन स्पष्ट दिसून येतो. त्याचप्रमाणे कर संकलन प्रणालीतील कार्यक्षमता तसेच वैद्यकीय आणि आरोग्य विभागाच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे नागरी केंद्रित प्रशासनासाठी महापालिकेची बांधिलकी देखील अधोरेखित होते. या प्रकल्पांमधून मिळालेल्या अंतर्दृष्टीचा कल्याण डोंबिवली शहराच्या विकास आराखड्यात समावेश करण्यासाठी उत्सुक असल्याचेही त्या म्हणाल्या.
यावेळी शिष्टमंडळास महापलिकेच्या विविध विभागामार्फत शहरात उभारण्यात आलेले प्रकल्प, योजना, उपक्रमांची संगणकीय सादरीकरणाद्वारे माहिती देण्यात आली. त्यामध्ये करसंकलन प्रणाली, स्मार्ट सारथी, अग्नी सुरक्षा सर्वेक्षण, अर्बन स्ट्रीट स्केप तसेच शिक्षण विभागाच्या वतीने राबविण्यात आलेल्या उपक्रमांचा समावेश होता. याव्यतिरिक्त, शिष्टमंडळाने मुंबई-पुणे-नाशिक रोडवरील अर्बन स्ट्रीट डिझाईननुसार विकसित करण्यात येणारे रस्ते, मोरवाडी येथील दिव्यांग भवन, मोशी येथील कचरा डेपो आणि कचऱ्यापासून वीजनिर्मिती प्रकल्प, वेस्ट टू बायोगॅस प्रकल्प, पिंपळेगुरव येथील ८ टू ८० उद्यान, पिंपळे सौदागर येथील लिनीअर गार्डन, शहरातील विविध उड्डाणपुलांखालील हॉकर्स झोन आदी प्रकल्पांना प्रत्यक्ष भेट देऊन त्यांची सविस्तर माहिती घेतली.
दरम्यान, आयुक्त शेखर सिंह म्हणाले, शहराचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी आरोग्य, वैद्यकीय, शैक्षणिक, आर्थिक, पर्यावरण आणि नागरी सुरक्षा अशा सर्वच क्षेत्रांमध्ये अत्याधुनिक प्रणालीचा वापर करून नागरिकांना केंद्रस्थानी ठेऊन अधिक जलद गतीने सेवा देण्यासाठी विविध नाविन्यपूर्ण उपक्रम आणि प्रकल्प राबविण्यात येत आहेत. पिंपरी चिंचवड महापालिकेचे वेस्ट टू एनर्जी, इंडिग्रेटेड कमांड कंट्रोल सेंटर, हरित सेतू, वेस्ट टू बायोगॅस तसेच दिव्यांग भवन हे नाविन्यपुर्ण उपक्रम इतर महापालिकांसाठी पथदर्शी उपक्रम ठरत आहेत. विविध सोयी सुविधांचा ई-गव्हर्नन्स प्लॅटफॉर्ममध्ये समावेश केल्याने नागरिक कोणत्याही अडथळ्याशिवाय थेट प्रशासानाशी संवाद साधत आहेत. या डिजिटल साधनांमुळे महापालिकेच्या केवळ कार्यक्षमतेत वाढ झाली नसून सर्वसमावेशकतेमध्येही सुधारणा झाली आहे. पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील मालमत्ता सर्वेक्षणामध्ये अधिक सुसूत्रता आणण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शहरातील मालमत्तांचे आता ड्रोनद्वारे सर्वेक्षण करण्यात येत आहे. याद्वारे शहरातील प्रत्येक मालमत्तेचे अत्यंत सुक्ष्म मोजमाप करण्यास मदत मिळत आहे. शहरातील सार्वजनिक परिसर पादचारी, सायकलप्रेमी, लहान शाळकरी मुलांसाठी आणि रहिवाशांसाठी उत्साहवर्धक बनवण्याचा महापालिकेचा उद्देश असून त्यासाठी हरित सेतू प्रकल्प राबविण्यात येत आहे. यामध्ये नागरी सहभाग आणि नाविन्यता यावर भर देण्यात येत आहे.
महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महापालिका विविध उपाययोजना राबवित असते. महापालिका शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सामाजिक, भावनिक, शारीरिक आणि विकासात्मक गरजा समजून त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली आहे. शाळांचे व शिक्षकांचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी महापालिकेने शाळांमध्ये मेंटोर शिक्षक देखील नेमले आहेत. राज्य शालेय शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये जिल्हास्तर गुणवत्ता प्राप्त करण्यासाठी विद्यार्थ्यांसाठी भारत दर्शन सहलीचे आयोजन देखील करण्यात येते. याशिवाय शाळांमधील शिक्षकांच्या कामावरील ताण कमी होण्यासाठी डेटा एन्ट्री ऑपरेटर्सची नेमणूक देखील करण्यात आली आहे. याशिवाय नागरिकांच्या येणाऱ्या तक्रारींवर विशेष लक्ष ठेऊन स्मार्ट सारथीच्या सहाय्याने नागरिकांच्या समस्या तात्काळ दूर करण्यावर महापालिका भर देत आहे, अशी माहिती देखील आयुक्त शेखर सिंह यांनी यावेळी दिली.








