रेल्वेच्या ‘रेस्टॉरंट ऑन व्हील्स’ या संकल्पनेंतर्गत आकुर्डी रेल्वे स्टेशन येथे ‘बोगी – वोगी’ रेस्टॉरंटचा शुभारंभ


रेल्वे प्रवाशांसह सर्वसामान्य नागरिकांसाठीही २४ तास खुले राहणार रेस्टॉरंट



दिग्दर्शक दिगपाल लांजेकर, अभिनेते अजय पुरकर यांच्या हस्ते रेस्टॉरंटचे उदघाटन

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – केंद्रीय रेल्वे बोर्डच्या ‘रेस्टॉरंट ऑन व्हील्स’ या संकल्पनेंतर्गत आकुर्डी रेल्वे स्टेशन याठिकाणी ‘बोगी – वोगी’ रेस्टॉरंटच्या दुसऱ्या शाखेचा शुभारंभ करण्यात आला आहे. या रेस्टॉरंटची पहिली शाखा मुंबई याठिकाणी आहे. हे रेस्टॉरंट वापरातून काढून टाकलेल्या रेल्वे डब्यात तयार केले असल्याने ज्याला बोगी वोगी, असे नाव देण्यात आले आहे.
या ‘बोगी – वोगी’ रेस्टॉरंटचे उदघाटन शुक्रवारी (दि. २० डिसेंबर) प्रसिद्ध सिने दिग्दर्शक दिगपाल लांजेकर, सिने अभिनेते अजय पुरकर आणि गायक अवधूत गांधी यांच्या हस्ते संपन्न झाले. उद्घाटनप्रसंगी संचालक नितीन चौगुले, मनिषसिंह तोमर, स्नेहा चौगुले, आर्किटेक्चर मंदार पोकळे, राजेंद्र चव्हाण, किरण पाटील, महेश यादव आदी उपस्थित होते.
या रेस्टॉरंटमध्ये ४४ जणांना बसण्याची सोय असून प्रवाशांना शाकाहारी आणि मांसाहारी असा दोन्ही जेवणांचा आस्वाद घेता येतो. त्याचबरोबर चहा, कॉफी, मॉकटेल, नाश्ता, साऊथ इंडियन, चायनीज या खाद्यपदार्थांचा आस्वादही रेल्वे प्रवाशांना घेता येणार आहे. मुंबईतील ‘रेस्टॉरंट ऑन व्हील्स’ सुरू झाल्यापासून आजतागायत हजारो प्रवाशांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत यामधील खाद्यपदार्थाचा आस्वाद घेतला आहे. या पार्श्वभूमीवर आकुर्डी रेल्वे स्टेशन येथे हे ‘बोगी – वोगी’ रेस्टॉरंट सुरु करण्यात आले असल्याची माहिती संचालक नितीन चौगुले यांनी यावेळी दिली.
आर्किटेक्चर मंदार पोकळे यांच्या संकल्पनेतून सदर ‘बोगी – वोगी’ या ‘रेस्टॉरंट ऑन व्हील्स’ची उत्तमरीत्या रंगरंगोटी केली गेली असून आतमध्ये अतिशय सुंदररित्या आसनव्यवस्था, डेकोरेशन करण्यात आली आहे. यामध्ये बोगीच्या दर्शनी भागात भक्ती शक्ती शिल्प, मोरया गोसावी मंदिर, रावेत येथील जगद्गुरू तुकाराम महाराज हँगिंग ब्रिज, आणि पिंपरी चिंचवड पुणे मेट्रो, आकुर्डी रेल्वे स्टेशन यांचे स्कायलाईन तयार करण्यात आली आहे. तसेच पुणे स्टेशनच्या निर्मितीचे जुने छायाचित्र व त्यासंदर्भातील माहितीही ग्राहकांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
संचालक नितीन चौगुले यांनी या नाविन्यपूर्ण उपक्रमाबद्दलचा उत्साह व्यक्त केला. ते म्हणाले की, रेस्टॉरंटमध्ये ११ टेबलसह ४४ जणांना बसण्याची उत्तम सोय करण्यात आली आहे. प्रवाशांना शाकाहारी आणि मांसाहारी असा दोन्ही जेवणांचा आस्वाद घेता येणार आहे. विशेष म्हणजे ही सेवा प्रवाशांसाठी २४ तास म्हणजेच रात्रीही उपलब्ध राहणार आहे. रेल्वे-थीम असलेल्या या रेस्टॉरंटमध्ये आपण स्वादिष्ट आणि हायजेनिक अन्नाचा आस्वाद घेऊ शकता तेही अगदी माफक दरात तसेच या ठिकाणी आम्ही प्रवाशांना २४ तास दिवसरात्र अविरत सेवा देणार आहोत. त्याचबरोबर प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आम्ही याठिकाणी सुरक्षारक्षकाचीही नेमणूक केली आहे.
आकुर्डी रेल्वे परिसरात अनेक शाळा, महाविद्यालये आहेत. अनेकदा रात्रीच्या वेळी हॉटेल्स बंद झाल्याने विद्यार्थ्यांची जेवणाची गैरसोय होते. त्यामुळे रेल्वे प्रवाशांबरोबरच येथील स्थानिक विद्यार्थी वर्ग आणि नागरिकांनादेखील या रेस्टॉरंटचा फायदा होईल. व तेदेखील आमच्या रेस्टॉरंटच्या जेवणाचा निश्चित आस्वाद घेतील, अशी आशा संचालक चौगुले यांनी यावेळी व्यक्त केली.








