ताज्या घडामोडीपिंपरी
“संस्कृती एकत्रित योगदानातून समृद्ध होते!” – प्रा. डॉ. श्रीपाल सबनीस

पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – “मानवी संस्कृती ही समाजाच्या एकत्रित योगदानातून समृद्ध होते!” असे विचार ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. डॉ. श्रीपाल सबनीस यांनी डॉ. पिंपरी व्यक्त केले.
ज्येष्ठ साहित्यिक पुरुषोत्तम सदाफुले लिखित आणि संवेदना प्रकाशननिर्मित ‘विचारवंतांचे अंतर्मन’ या समीक्षापर पुस्तकाचे प्रकाशन करताना प्रा. डॉ. श्रीपाल सबनीस बोलत होते. सौरभ पाटील, नारायण सुर्वे साहित्य कला अकादमीचे अध्यक्ष सुदाम भोरे, महाराष्ट्र साहित्य परिषद – भोसरी शाखाध्यक्ष मुरलीधर साठे, व्याख्याते प्रा. दिगंबर ढोकले, बाबा भारती प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेंद्र भारती, इंद्रायणी साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष अरुण बोऱ्हाडे, सामाजिक कार्यकर्त्या सुप्रिया सोळांकुरे, लेखिका ललिता सबनीस, प्रकाशक नितीन हिरवे आणि लेखक पुरुषोत्तम सदाफुले यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रा. डॉ. श्रीपाल सबनीस पुढे म्हणाले की, “मूळ पिंड लेखकाचा असलातरी पुरुषोत्तम सदाफुले यांनी साहित्य अन् संस्कृतीच्या संवर्धनासाठी आपले जीवन समर्पित केले आहे. या वाटचालीत विविध समाजसुधारक, नेते, विचारवंत, साहित्यिक, कलावंत आणि प्रतिभावंतांचे सान्निध्य त्यांना लाभले. या सार्वकालीन अन् समकालीन व्यक्तिमत्त्वांच्या
वेगवेगळ्या विचारसरणीबाबत भेदाभेद न करता कविहृदयाच्या सदाफुले यांनी त्यांचे अंतर्मन जाणून घेत त्यांची विचारमौक्तिके या पुस्तकात संकलित केली आहे. हे केवळ वैचारिक संकलन नसून संस्कृतीच्या विकास अन् संवर्धनासाठी त्यावर मनन अन् चिंतन करीत त्यांनी समीक्षापर भाष्य केले आहे. त्यामुळे समाजाच्या विचारशुद्धीसाठी अशा ग्रंथाची नितांत गरज असताना मराठी साहित्यप्रवाहाला समृद्ध करणारे डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील यांना सदर ग्रंथ समर्पित करीत सदाफुले यांनी ऋण व्यक्त केले आहे!”
याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना सुदाम भोरे यांनी, “सर्वसामान्य माणसांना सहज भेटणारा पांडुरंग म्हणजे डॉ. पी. डी. पाटील हे व्यक्तिमत्त्व आहे; तर सदाफुले हे साहित्यपंढरीचे वारकरी आहेत!” अशी भावना व्यक्त केली. प्रा. दिगंबर ढोकले यांनी, “‘विचारवंतांचे अंतर्मन’ वाचल्यावर सर्वसामान्य माणूसदेखील ज्ञानी होईल असे या ग्रंथाचे स्वरूप आहे!” असे मत व्यक्त केले. सौरभ पाटील यांनी मान्यवरांचे स्वागत केले. मुकुंद औटी, बाजीराव सातपुते, अरुण गराडे, प्रभाकर वाघोले, प्रदीप गांधलीकर, वर्षा बालगोपाल, एकनाथ उगले यांनी संयोजनात सहकार्य केले.













