चिंचवडताज्या घडामोडीपिंपरी
“गो आधारित शेती आणि उत्पादनांनी देश सक्षम होईल!” – दिनेश उपाध्याय


पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – “गो आधारित शेती आणि उत्पादनांनी देश सक्षम होईल!” असे विचार अखिल भारतीय गोरक्षा प्रमुख दिनेश उपाध्याय यांनी विश्व हिंदू परिषद सभागृह, चिंचवड येथे व्यक्त केले.
विश्व हिंदू परिषद – पश्चिम महाराष्ट्र प्रांत आणि गोरक्षा आयाम आयोजित कार्यकर्ता प्रबोधन शिबिरात मार्गदर्शन करताना दिनेश उपाध्याय बोलत होते. क्षेत्र गोरक्षा संघटन मंत्री भाऊराव कुदळे, प्रांत मंत्री किशोर चव्हाण, प्रांत सह मंत्री ॲड. सतिश गोरडे, प्रांत गोरक्षा प्रमुख सी ए महेंद्र देवी, प्रांत सह प्रमुख कौस्तुभ देशपांडे, सहप्रमुख विलास फाटक, क्षेत्र गोभक्त महिला प्रमुख सुनीता देशमुख, विभाग मंत्री शिव व्यास, जिल्हा मंत्री संतोष खामकर इत्यादी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
दिनेश उपाध्याय पुढे म्हणाले की, “गोरक्षा आयामाचे काम करीत असताना वेगवेगळा दृष्टिकोन ठेवावा. संघटनात्मक दृष्टिकोनातून कार्य केल्यास आपल्याला कार्यकर्ते मिळतात. कार्यकर्ता प्रशिक्षणाची व्यापकता वाढवून आर्थिक सक्षमतेबाबत नियोजन केले पाहिजे; तसेच उपक्रमाच्या यशाचे मूल्यमापन करावे!”
प्रांत कार्यालय प्रमुख अनंत पाठक यांच्या योगदानाबाबत ॲड. सतिश गोरडे यांनी माहिती देऊन त्यांच्या दुःखद निधनाबद्दल श्रद्धांजली अर्पण केली. त्यानंतर दीपप्रज्वलन, त्रिवार ओंकार, एकात्मता मंत्र आणि विजय महामंत्राने कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. कौस्तुभ देशपांडे यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला. महेंद्र देवी यांनी प्रास्ताविकातून महाराष्ट्रातील विविध देशी गाईंच्या प्रजातीविषयी माहिती दिली. भाऊराव कुदळे यांनी पंचगव्य याविषयी ऊहापोह केला. सुनीता देशमुख यांनी जिल्ह्यास्तरावर गोरक्षा महिला प्रमुख असाव्यात, अशी मागणी केली. नितीन सातव यांनी शेणापासून तयार करण्यात येऊ शकतील अशा विविध वस्तुंची माहिती चित्रांच्या माध्यमातून दिली. अशा वस्तुंच्या विक्रीबाबत तुषार वाघ यांनी साहाय्यक बाबींचा ऊहापोह केला. शिव व्यास यांनी गोमातेचा महिमा कथन केला. किशोर चव्हाण यांनी आयामाचे महत्त्व आणि संघटनात्मक कामाबाबत माहिती दिली. कुंभमेळ्याच्या निमित्ताने गोरक्षणाविषयी कायद्यासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करण्यात यावा, असे सर्वानुमते मंजूर करण्यात आले. शांतिमंत्राने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.








