हेल्मेट नसल्यास पिंपरी चिंचवड पालिका भवनात नो एन्ट्री


पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील अधिकारी व कर्मचार्यांना दुचाकीवर असताना हेल्मेट वापरणे सक्तीचे केले आहे. हेल्मेट असल्याशिवाय अधिकारी-कर्मचार्यांसह इतर नागरिकांना महापालिकेत प्रवेश दिला जात नाही. त्यामुळे महापालिका भवनाच्या बाहेरील बाजूस दुचाकी लावण्यासाठी गर्दी होत आहे.



राज्यात दुचाकी अपघातामध्ये होणार्या मृत्यूंची संख्या लक्षणीय आहे. हेल्मेटचा वापर केल्यास मृत्यू संख्येमध्ये निश्चित घट होऊ शकते, असे निदर्शनास आणून देण्यात आले. याची दखल घेऊन वाहनचालकाने स्वतः आणि सोबत बसलेल्या व्यक्तीने रस्ता सुरक्षा मानकांची पूर्तता करणार्या हेल्मेटचा वापर करावा. त्यासाठी प्रशासनाने दुचाकी वाहनचालकांसाठी हेल्मेट वापराची सक्ती करावी. वाहतूक नियमांबाबत जनजागृती करावी, अशा सक्त सूचना रस्ता सुरक्षा समितीचे अध्यक्ष न्यायमूर्ती अभय सप्रे यांनी दिल्या आहेत.

त्यानुसार, पुणे विभागीय कार्यालयातंर्गत सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, महामंडळे, महापालिका, नगरपालिका, नगर परिषद, महाविद्यालये तसेच, शासकीय यंत्रणांच्या कार्यालयात काम करणार्या अधिकारी व कर्मचार्यांना दुचाकी वाहन वापरताना हेल्मेट वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. याबाबतचे पालन सर्व कर्मचार्यांनी करावे, असे निर्देश विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिले होते.
त्याप्रमाणे महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी महापालिका आधिकारी व कर्मचार्यांसाठी हेल्मेटसक्तीचा आदेश काढला आहे. मोटार वाहन कायदा, 1988 च्या कलम 129 नुसार दुचाकी चालविणार्या तसेच, दुचाकीवरून पाठीमागे बसणार्या व्यक्तीने हेल्मेट परिधान करणे बंधनकारक आहे. मोटार वाहन कायद्यातील तरतुदींचे पालन करणे प्रत्येक शासकीय अधिकारी, कर्मचार्याचे कर्तव्य आहे. या निर्देशाचे उल्लंघन केल्यास व तसे निदर्शनास आल्यास विभाग प्रमुखांनी अशा अधिकारी व कर्मचार्यांना शिस्तभंग केल्याबाबत दंडात्मक कारवाई करून सेवा पुस्तकांत नोंद कराव्यात. हेल्मेट नसल्यास महापालिका कार्यालय परिसरात दुचाकीला प्रवेश आणि पार्किंगकरिता परवानगी देऊ नये, असेही आदेशात म्हटले आहे.
त्यानुसार, प्रत्यक्ष कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. दुचाकीवर आलेल्या अधिकारी, कर्मचारी तसेच, सामाजिक कार्यकर्ते, ठेकेदाराचे प्रतिनिधी, नागरिकांच्या डोक्यावर हेल्मेट नसल्यास त्यांना महापालिकेत प्रवेश दिला जात नाही. त्यामुळे त्यांना माघारी फिरावे लागत आहे. महापालिकाबाहेरील आवारात त्यांना दुचाकी पार्क करावे लागत आहे. परिणामी, परिसरात दुचाकीची संख्या वाढली आहे.








