ताज्या घडामोडीपिंपरी
राज्यात महायुतीला वंचितांची निर्णायक मतं मिळवण्यात आ. अमित गोरखे यांचा मोलाचा वाटा


आ. गोरखे यांच्या कामगिरीची योग्य दखल घेतली जावी – महाराष्ट्र सकल मातंग समाजाची मागणी
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – शनिवारी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या निकालामध्ये महायुतीला यामध्ये घवघवीत यश मिळाले. महायुतीमध्ये भाजप हा मोठा पक्ष आहे. भाजपला मिळालेल्या या यशामध्ये केंद्रीय व राज्य पातळीवरील अनेक प्रमुख नेत्यांचे व स्टार प्रचारकांचे योगदान आहे. यामधे राज्य पातळीवरील एक तरुण आश्वासक चेहरा म्हणून आमदार अमित गोरखे यांच्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वपूर्ण जबाबदारी दिली होती ती जबाबदारी त्यांनी यशस्वीरित्या पूर्ण केल्याचे दिसते. विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे यांनी राज्यभर सभा बैठका घेऊन अनुसूचित जाती, आणि दलित, वंचित समाजाची निर्णायक मतं भाजपा व महायुतीकडे वळविण्यात मोलाचा वाटा उचलला आहे. गोरखे यांनी केलेल्या या प्रचार दौऱ्याची राज्यभर चर्चा सुरू आहे.
विधानसभा निवडणुकीपूर्वी आमदार अमित गोरखे यांनी बहुजन संवाद यात्रेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर बैठका, सभा घेऊन राज्य सरकारने घेतलेले महत्त्वपूर्ण निर्णय सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम केले. आ. गोरखे यांनी २३ जिल्हे, १५० हुन अधिक तालुके आणि ७२ विधानसभा मतदारसंघात जाऊन समाजातील सामान्य जनतेशी संवाद साधला. त्यांचे प्रश्न, समस्या जाणून घेतल्या. विरोधकांनी जो संविधान बदलण्याचा फेक नरेटिव्ह चालवण्याचा प्रचार केला होता तो खोडून काढण्याचे काम आ. गोरखे यांच्या सभांमधून झाले. त्यामुळे दलित, अनुसूचित संख्या जास्त असणाऱ्या मतदारसंघात मतदारांनी महायुतीला भरघोस मतदान केले. त्यामुळे आगामी काळात पक्षश्रेष्ठींकडून आमदार अमित गोरखे यांच्या कामगिरीची योग्य दखल घेतली जाईल अशी अपेक्षा महाराष्ट्र राज्य सकल मातंग समाजाच्या शिष्टमंडळाने माध्यम प्रतिनिधींशी बोलताना व्यक्त केली.








