ताज्या घडामोडीपुणे
रिक्स घेणाराच आयुष्यात यशस्वी होतो नारायण सुब्रमण्यम


‘एमआयटी एडीटी’ विद्यापीठाच्या ‘मेराकी-२४’ ला प्रारंभ
पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – भविष्यकाळ हा डिजाईन क्षेत्रासाठी सुवर्णकाळ असणार आहे. डिजाइनर शिवाय सध्या कुठल्याही गोष्टीचे स्वरूप किंवा तिच्या अस्तित्वाची कल्पना करणे अशक्य आहे. अशावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पनाशक्तीतील गोष्टींना मूर्त स्वरूप देऊन स्पप्नांना सत्यात उतरविण्यासाठी सर्वोत्तम देत परिश्रम घ्यायला हवेत. आवडीच्या क्षेत्रात प्लॅन ‘बी’चाही विचार आपल्या मनाला शिवू न देता कष्ट केल्यास, यशाची प्राप्ती नक्कीच होते, असा विश्वास अल्ट्रावायलेट ऑटोमोटिव्ह कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी नारायण सुब्रमण्यम यांनी व्यक्त केला.
ते एमआयटी आर्ट, डिझाईन व टेक्नाॅलाॅजी विद्यापीठ, विश्वराजबाग, पुणेच्या इन्स्टिट्यूट ऑफ डिजाईन (आयओडी) तर्फे कोरेगाव पार्क येथील ‘कोपा’ माॅलमध्ये आयोजित ‘मेराकी-२४’ च्या उद्घाटन समारंभाप्रसंगी बोलत होते. याप्रसंगी, एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष तथा कुलगुरू प्रा.डाॅ.मंगेश कराड, आयओडीचे संचालक डाॅ.नचिकेत ठाकूर, अधिष्ठाता प्रा.आनंद बेल्हे, मीस युनिवर्स मध्य प्रदेश कोपाल मंडलोई, प्रा.अमित सिन्हा, प्रा.अर्शिया कपूर, शौनिक दत्ता राॅय आदी उपस्थित होते.
प्रा.डाॅ. कराड हे यावेळी बोलताना म्हणाले, ‘मेराकी-२४’ हा इन्स्टिट्यूट ऑफ डिजाईनच्या अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या नाविन्यपूर्ण कल्पनांचे, प्रकल्पांचे सादरीकरण करणारा आमचा एक महत्वाकांक्षी कार्यक्रम आहे. या माध्यमातून व्यावसायिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या तज्ञांना आमंत्रित करून विद्यार्थ्यांशी त्यांना जोडले जाते. त्यामुळे, विद्यार्थ्यांच्या नाविन्यपूर्ण कल्पनांना वाव तर मिळतोच परंतु, त्यांचा आत्मविश्वास देखील उंचावतो. त्यामुळे ‘एमआयटी आयओडी’च्या या उपक्रमाच्या माध्यमातून नाविन्यपूर्ण डिजाईनर तयार होत आहेत.
‘मेराकी-२४’ च्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या विविध नाविन्यपूर्ण डिजाईन्सचे प्रदर्शन कोरेगाव पार्क येथील ‘कोपा’ माॅलध्ये शनिवार दि. २३ नोव्हेंबर सायंकाळपर्यंत नागरिकांना पाहण्यास उपलब्ध असेल. त्यासाठी नागरिकांना निशुल्क प्रवेश दिला जाईल. तसेच, यानिमित्ताने फॅशन डिजाईन अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांच्या वतीने फॅशन शो’चे देखील आयोजन करण्यात आले आहे. ज्याला पुणेकरांनी अवश्य भेट द्यावी, असे आवाहन ‘आयओडी’चे संचालक डाॅ.ठाकूर यांनी केले आहे.








